पुणे (Pune) : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सुधारित पर्यावरण परवानगी मिळाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला या प्रकल्पांचे काम वेगात करता येणार आहे. महापालिकेने संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यान नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम मार्च २०२२ मध्ये सुरू केले आहे. संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंतच्या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यानचे काम २७ टक्के पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी याविरोधात मोहीम उघडली होती. तरीही महापालिकेने काम सुरू ठेवल्याने सारंग यादवडकर यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यामध्ये झालेल्या सुनावणीत नदीला येणारा पूर, वृक्षतोड यासह अन्य प्रकारचे पर्यावरण विषयक मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर एनजीटीने महापालिकेला सुधारित पर्यावरण परवानगी आणल्यानंतर कामे करावीत, असे आदेश दिले होते. या आदेशामुळे नदीकाठच्या झाडांची छाटणी, वृक्षतोड यासह त्यांचे पुनर्रोपण करणे आदी कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे अन्य कामेही थांबली होती.
पुणे महापालिकेने सुधारित पर्यावरण परवानगी मिळविण्यासाठी पुरस्थितीसंदर्भातील तांत्रिक माहितीसह राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे (स्टेट एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट अॅथॉरीटी - सिया) अहवाल सादर केला होता. पण ‘सिया’चे सदस्य नियुक्त झाले नसल्याने त्यावर सुनावणी होऊन महापालिकेला परवानगी मिळण्यास उशीर होत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सिया’कडे झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेने सादर केलेला आराखडा योग्य असल्याने पर्यावरण परवानगी देण्यात आली. पुणे महापालिकेने ही सुधारित पर्यावरण परवानगी एनजीटीमध्ये सादर केली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये यादवडकर यांनी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उर्वरित काम करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेतर्फे एनजीटीमध्ये ॲड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली.
पुणे महापालिकेने ‘सिया’कडून सुधारित पर्यावरण परवानगी मिळवल्यानंतर ती एनजीटीमध्ये सादर केली. त्यामुळे एनजीटीने महापालिकेविरोधात दाखल झालेली याचिका फेटाळून लावली आहे. संगमवाडी ते मुंढवा पूल या दरम्यानची उर्वरित कामे करण्यास यामुळे वेग येणार आहे.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका
नदी काठ सुधार प्रकल्प दृष्टीक्षेपात
- नदीकाठ सुधार प्रकल्पाची लांबी - ४४ किलोमीटर
- एकूण खर्च -४७२७ कोटी
- प्रकल्पाचे टप्पे - ११
सध्या सुरू असलेल्या कामाची स्थिती
- संगमवाडी ते बंडगार्डन ८५ टक्के काम पूर्ण
- बंडगार्डन ते संगमवाडी २७ टक्के काम पूर्ण
- बाणेर ते औंध दरम्यानच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू