Nana Patole Tendernama
पुणे

Nana Patole : कंत्राटी भरती बंद करणार... असे का म्हणाले नाना पटोले?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी MPSC) परीक्षेसंदर्भात माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशी आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वीकारणार नाही. त्याचप्रमाणे विविध खात्यांमधील कंत्राटी पद्धतीची भरती बंद करून रिक्त जागांवर कायमस्वरूपी भरती करण्यात येईल, असे आश्‍वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विद्यार्थ्यांना दिले. त्याचबरोबरच बार्टी, महाज्योती, अमृत आदी महामंडळांच्या कारभाराची चौकशी करून अधिक पारदर्शकता आणण्यात येईल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि ‘एमपीएससी’च्या विद्यार्थांच्या प्रश्‍नांसंदर्भात आयोजित बैठकीत पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे लोकसभा समन्वयक अजित दरेकर, एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी आंदोलनकर्ते बळिराम डोळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

चालू आर्थिक वर्षात ३४ विभागांतील राज्यसेवा आयोगाच्या सर्व जागा भराव्यात. पोलिस निरीक्षक पदांची काढलेली २१६ जागांच्या भरतीची जाहिरात रद्द करावी. त्याऐवजी रिक्त सर्व पदांची भरती करावी. दळवी आयोगाच्या शिफारशी रद्द कराव्यात. त्याऐवजी नव्या आयोगाची स्थापना करावी. भरती प्रक्रियेत बोगस दिव्यांग, खेळाडूंचे प्रमाणपत्र देऊन भरती होणाऱ्यांची चौकशी करावी. बार्टी, महाज्योती, अमृतसारख्या महामंडळांची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.

पटोले म्हणाले...

- राज्यातील सरकार आंधळे अन् बहिरे

- विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही

- यूपीएससीकडून कशाप्रकारे भरती होते, याचे उदाहरण आपण पाहिले

- ‘त्या’ प्रकरणावरून आयोगाच्या कामकाजावरील विश्‍वास उडाला