पुणे (Pune) : PMPच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या ई-बस (E-Bus), रेल्वेच्या (Railway) मार्गांचे व स्थानकांचे विस्तारीकरण, विमानांच्या फेऱ्यांची वाढलेली संख्या व विमानतळाचे (Airport) विस्तारीकरण, रिक्षा, कॅब आणि मेट्रोची (Metro) पायाभरणी यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीत आता बहुविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. मात्र, शहरांतर्गत वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची दमछाक होत आहे.
मेट्रो, ‘पीएमपी’च्या बस, एसटी, रेल्वे, रिक्षा, कॅब आदींद्वारे शहरात सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविली जाते. कालानुरूप यात बदल होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचाही त्यात अंगीकार होत आहे. सुमारे ६० लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या शहरात सार्वजनिक वाहतुकीद्वारे पिंपरी-चिंचवड आणि जिल्हाही जोडला गेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी ‘पीएमपी’चा प्रवास हा लाइफलाइनच्या दिशेने होत आहे.
पीएमपीची दररोजची बससंख्या आता १६०० हून अधिक झाली असून, तीन हजार बसचा टप्पा गाठण्यासाठी नव्या बसच्या खरेदीचीही प्रक्रिया सुरू आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढती असून, राज्यातील सर्वाधिक ई-बस पुण्यात आहेत; तर डिझेलवरील बस आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिल्या आहेत.
गुगलच्या मदतीने प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन मिळण्याचाही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि हडपसर रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे अल्पावधीतच आणखी नव्या शहरांशी पुणेकर रेल्वेने जोडले जातील. शहरातील रिक्षांची संख्या एक लाखापर्यंत पोचली आहे.
बाईक-टॅक्सीला उच्च न्यायालयाने सध्या बंदी घातल्यामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे, तर कॅबच्या माध्यमातून प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शहरात मेट्रोची वाहतूक वनाज-गरवारे कॉलेज आणि पिंपरी ते फुगेवाडीदरम्यान सुरू आहे. भविष्यात त्या मार्गांचे विस्तारीकरण होणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची संख्या वाढत असतानाच शहरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी वाढत नसल्यामुळे कोंडीची समस्या तीव्र होत आहे. मध्यभागातील अतिक्रमणे दूर झाली आणि पोलिसांचे नेटके नियमन झाल्यास कोंडीची समस्या कमी होऊ शकते.
रेल्वे :
पुणे रेल्वेस्थानक
- दैनंदिन प्रवासी रेल्वे : २५०
- प्रवासी संख्या : दररोज दीड लाख
- लोकलची संख्या : ४१
रिमॉडेलिंग प्रकल्पाबाबत
- पुणे रेल्वे स्थानकाचा रिमॉडेलिंग खर्च ५१ कोटी
- एप्रिलमध्ये कामाला सुरुवात होणार, २८८ दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
- फलाटांची लांबी वाढणार, त्यामुळे २४ डब्यांच्या रेल्वेही पुण्यातून वाहतूक करणार
- परिणामी अधिक प्रवासी रेल्वेत सामावले जाणार
पीएमपी
- पीएमपीच्या ताफ्यातील १६५० बस रस्त्यावर धावताहेत
- दररोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतात
- या वर्षात बसच्या संख्येत वाढ होणार
- पुणेकरांची अनेक दिवसांची डबलडेकरची मागणीही पूर्ण होणार
- पहिल्या टप्प्यात पीएमपी प्रशासन ५० डबलडेकर बस खरेदी करतेय
बीआरटी
- ‘पीएमपी’चा पुन्हा एकदा ‘बीआरटी’च्या विस्तारीकरणांवर भर
- एकूण आठ मार्गांवर बीआरटी सुरू, काही मार्गावर अजूनही कामे सुरू
- बोपोडी-वाकडेवाडीसाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्चून नवा बीआरटी मार्ग बांधताहेत
- ‘बीआरटी’ सक्षम करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
पुणे विमानतळ
- मे महिन्यापर्यंत पुणे विमानतळावरील दुसरी टर्मिनल इमारत बांधून तयार होईल
- विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होईल, प्रवासी वहन क्षमताही वाढेल
- पाच नवे एरोब्रिज नव्या टर्मिनलमध्ये वापरणार
- कार्गोसेवेचाही विस्तार होतोय
- अमेरिका, युरोपसाठी पुण्यातून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू
- पुणे-मुंबई विमानसेवेसाठी दोन विमान कंपन्यांनी वाहतूक सुरू करण्याची तयारी, येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू होणार
एसटी
- पुणे विभागात लवकरच नवीन बांधणी केलेली एसटी दाखल होणार
- परिणामी ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल
- सध्या पुणे विभागात सुमारे ८०० बस
- नव्या दोन हजार गाड्यांची खरेदी करणार
रिक्षा
- शहर आणि परिसरातील रिक्षांची संख्या सुमारे एक लाखांवर पोचलीय
- प्रवासासाठी अजूनही मोठा प्रवासी वर्ग रिक्षावरच अवलंबून
- प्रवाशांच्या तक्रारी कमी झाल्यास रिक्षा व प्रवाशांचे नाते दृढ होऊ शकते
कॅब
- २०२०-२१ मध्ये शहरात सुमारे ३० हजार कॅब होत्या
- आता कॅबची संख्या सुमारे ४० हजारांवर पोचलीय
- परिणामी प्रवाशांना बहुविध पर्याय उपलब्ध झाले
- कॅबसाठीचे वेटिंगही कमी झाले
लोकसंख्येच्या तुलनेत केवळ आठ ते दहा टक्केच नागरिक पीएमपीचा प्रवास करतात. ती संख्या २० टक्क्यांपर्यंत गेली पाहिजे. अनेक प्रवासी पर्याय नाही म्हणून पीएमपीच्या बसने प्रवास करतात. पीएमपी प्रवाशांची पहिली प्राथमिकता बनण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यासाठी ‘पीएमपी’शी अन्य वाहतुकीची साधने जोडली गेली पाहिजे.
- संजय शितोळे, सदस्य, पीएमपी प्रवासी मंच, पुणे
रस्त्याचा वापर सगळ्यांसाठी सोयीचा झाला पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता खासगी वाहनाची संख्या कमी झाली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सर्वंकष धोरण राबविणे आवश्यक आहे. बसची संख्या वाढवली म्हणजे सार्वजनिक वाहतूक सुधारेल असे नाही. यासाठी सर्वांचा एकत्रित विचार झाला पाहिजे.
- प्रशांत इनामदार, वाहतूक तज्ज्ञ, पुणे