Multimodal Cargo Hub Tendernama
पुणे

पुणे विभागातील 6 रेल्वे स्थानकांवर मल्टीमॉडेल कार्गे हब

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोणी, सासवड, चिंचवड, तळेगाव, पाटस व मिरज या सहा रेल्वे स्थानकांवर 'मल्टिमॉडेल कार्गो टर्मिनल' होणार आहे. गती शक्ती युनिटच्या अंतर्गत रेल्वेच्या जमिनींचा व्यावसायिक वापर करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. यात पुणे विभागातील सहा स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे छोट्या उद्योजकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

टर्मिनलवर व्यावसायिकांना उत्पादन, प्रक्रिया, पायाभूत सुविधा, गोडाऊन यांसारख्या सुविधा कमी दरात उपलब्ध होतील. परिणामी, ग्रामीण भागातील व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदाच 'गती शक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले असून माल वाहतुकीला चालना मिळावी; तसेच रेल्वेच्या मोकळ्या जागेचा वापर करून उत्पन्न वाढविणे हा हेतू ठेवून पुण्यासह देशांतील विविध रेल्वे विभागांत यावर काम केले जात आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाने विभागातील २२ स्थानके व जागांसाठी इच्छुकांकडून माहिती मागविली होती. त्यापैकी सहा स्थानकांसाठी उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला. त्यांना ५ ते ३५ वर्षांसाठी रेल्वेची जागा भाड्याने मिळेल. त्या बदल्यात त्यांना १.५ टक्के इतके जमीन परवाना शुल्क द्यावे लागणार आहे. पूर्वी हे शुल्क सहा टक्के होते. यात आता मोठ्या प्रमाणात घट झाल्याने छोटे उद्योजक त्याकडे आकर्षित होतील.

कार्गो टर्मिनलमधील सुविधा
१) मालगाडीने ज्या उत्पादनाची वाहतूक होते, त्यापैकी स्थानकाजवळील जागेत कोणतेही एक उत्पादन घेता येणार.
२) त्याचठिकाणी त्या उत्पादनावर प्रक्रिया करता येणार.
३) माल वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होणार.
४) गोडावूनच्या सुविधेमुळे माल साठविता येणार.

रेल्वेतून वाहतूक
सिमेंट, खते, मीठ, मका, साखर, ऑटोमोबाईल साहित्य

पुणे विभागात सहा स्थानकांवर मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल तयार होतील. कमी दरात उद्योजकांना स्थानक व परिसरात उद्योग उभारता येणार आहे. त्याचा फायदा छोट्या व्यावसायिकांना मिळणार आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे