temghar dam Tendendernama
पुणे

Pune: 'त्या' ग्रामपंचायतेंचे वाचणार लाखो रुपये; काय आहे नवी योजना?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून प्रस्तावित केलेल्या टेमघर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी ग्रॅव्हिटीने वितरित केले जाणार असल्याने संबंधित ग्रामपंचायतींचे वीज पंपांसाठी येणारे लाखो रुपयांचे वीज बिल वाचणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर येणारा आर्थिक ताण कमी होणार आहे.

सध्या या खोऱ्यातील गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतांशी विहिरी मुठा नदी काठावर आहेत. नदीत पाणी सोडलेले असेल तरच काही विहिरींमध्ये पाणी साचते. अन्यथा उन्हाळ्यात या विहिरी कोरड्या पडल्याने पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे जर ही योजना राबविली तर ही समस्या दूर होणार आहे.

नदीमध्ये म्हशी, गुरे तसेच अन्य जनावरे धुतली जातात. तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांकडून बऱ्याचदा दारूच्या काचेच्या बाटल्या, बिअरचे डबे, प्लास्टिक तसेच अन्य वस्तू या पाण्यात फेकल्या जातात. बहुतांशी गावांतील स्मशानभूमी नदीकाठावर आहेत. अंत्यविधीचे साहित्य नदीत फेकले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

ही योजना राबविल्यास प्रदूषित पाण्याऐवजी शुद्ध पाणी पुरवठा होणार असून, आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत. सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीला पाणी वितरणासाठी किमान दोन व त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते. त्यांचा मासिक पगार, देखभाल यांचा खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. टेमघर योजना राबविल्यास एक कर्मचारी पुरेसा होणार असल्याने देखभाल खर्चात बचत होणार आहे.

या योजनेच्या तत्कालीन आराखड्यानुसार, टेमघर धरणालगतच तीन ते चार एकर जागेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असून, त्याची क्षमता १४ हजार दशलक्ष लिटर होती. मुठा खिंडीत उंचावर टाकी उभारून पूर्वेकडील सात गावांना पुरवठा केला जाणार होता. मुठा खोऱ्यातील १८ गावांना प्रतिदिन प्रतिमाणसी ४० लिटरप्रमाणे, तर मुठा खिंडीच्या पूर्वेकडील निमशहरी असलेल्या ७ गावांना प्रतिदिन प्रतिमाणशी ७० लिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जाणार होता.

सन २०३०ची लोकसंख्या विचारात घेऊन आराखडा तयार केलेला होता. सन २०१४ मध्ये या योजनेत समावेश असलेल्या गावांची लोकसंख्या सुमारे ४३ हजार इतकी होती. सन २०३०मध्ये ही लोकसंख्या सुमारे नव्वद हजार होईल. या योजनेत एकूण १८ साठवण टाक्या उभारण्यात येणार होत्या. पूर्वेकडील निमशहरी गावांसाठी एचडीपीई पाइप वापरला जाणार होता. विशेष बाब म्हणून टेमघर धरणातील साठ्याच्या १० टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार होते.

सध्या ही योजना राबवायची झाल्यास मुठा खिंडीच्या पूर्वेकडील गावांना त्यातून वगळावे लागेल. कारण, मुळशी प्रादेशिक टप्पा क्रमांक दोनमधून या पूर्वेकडील गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र, मुठा खोऱ्यातील अठरा गावांना ही योजना वरदान ठरणार आहे.

या योजनेसाठी सन २०१४मध्ये ७१ कोटी रुपये खर्च येणार होता. सन २०३०ची लोकसंख्या विचारात घेऊन त्याचा आराखडा तयार केला होता. सुमारे नव्वद हजार लोकसंख्येला या योजनेचा लाभ होणार होता. मात्र, ही योजना मोठी व खर्चिक असल्याचे कारण सांगून निधीच्या कमतरतेमुळे तत्कालीन मंत्रिमंडळाने या योजनेला केराची टोपली दाखविली.

शासनाच्या मंजुरीअभावी रेंगाळलेल्या व बाजूला पडलेल्या या योजनेच्या कामाचे टेंडर काढता आले नाही. ही योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुठा खोऱ्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

आमच्या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन ठिकाणी विहिरी खोदलेल्या आहेत. त्यांपैकी एक विहीर मुठा नदीलगत असलेल्या पाटोळीच्या शेतात खोदलेली आहे. ही विहीर अगदी नदीपात्रात असूनही उन्हाळ्यात मुठा नदीतच पाणी नसल्याने विहिरीलाही पाणी नसते. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. टेमघर प्रादेशिक पाणी योजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे.

- के. बी. चौधरी, माजी सरपंच, माळेगाव (ता. मुळशी)

टेमघर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविल्यास विजेची बचत होणार आहे. शिवाय शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही योजना सुरू करावी.

- अमित कुडले, ग्रामस्थ, जातेडे (ता. मुळशी)