ST Bus Stand - MSRTC Tendernama
पुणे

MSRTC : एसटीच्या वायफायला रेंजच मिळेना! काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध केली खरी, मात्र त्याच्या वापरात सध्या अडचणी येत आहेत. तिकिटासाठी यूपीआय अॅपचा वापर करण्याबाबत प्रवाशांची आग्रही भूमिका असते, मात्र वाहकांकडून विविध सबबी सांगून रोकडविरहित ऐवजी (कॅशलेस) रोख व्यवहार करण्यासाठी प्रवाशांवर दबाव टाकण्यात येत आहे.

कधी क्यूआर कोड स्कॅन होत नाही, तर कधी वायफायला रेंज नाही, अशी विविध कारणे प्रवाशांना दिली जात आहेत. परिणामी एसटीत रोकडविरहित व्यवहाराचे प्रमाण अजूनही ४ ते ५ टक्केच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या रोकडविरहित प्रवासात प्रवाशांना अजूनही धक्के खावे लागत आहेत.

देशात सर्वत्र रोकडविरहित व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना एसटीमध्ये मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तववादी चित्र आहे. एसटीचा सर्वाधिक प्रवासी हा ग्रामीण भागातला असून, तो आजही तंत्रज्ञानापासून दूर असल्याचा समज एसटी प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवासीदेखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानस्नेही आहेत.

दिवाळीच्या काळात एसटीने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली. यात तरुण प्रवाशांची संख्यादेखील जास्त होती. त्यांनी वाहकाकडे क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटाची रक्कम अदा करण्याची विनंती केली, मात्र वाहकांनी आपल्या जवळचे मशिन नादुरुस्त आहे. त्यावरील ‘क्यूआर’ स्कॅन होत नसल्याचे अनेक गाड्यांमधील वाहकांनी सांगितले. त्यामुळे रोख रक्कम जवळ न बाळगणाऱ्या अथवा सुट्ट्या पैशांची कमतरता असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

वर्षात केवळ ४ टक्के वापर

राज्य परिवहन महामंडळाने ७ डिसेंबर २०२३ ला ‘यूपीआय’ अॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा राज्यातील सर्व आगारांत सुरू केली. वाहकांच्या जवळ असणाऱ्या ‘इटीआय’ मशिनमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले. यातच क्यूआर कोडची सुविधा देण्यात आली.

गेल्या वर्षभरात याचा वापर केवळ ३ ते ४ टक्केच झाला असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे, तर मोबाइल अॅप व संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण १५ ते १८ टक्के झाले आहे.

टप्प्यावरचा प्रवास अडखळला

एसटी महामंडळाने रोकडविरहित व्यवहारांसाठी दोन टप्प्यांमध्ये नियोजन केले. पहिल्या टप्प्यात यूपीआय अॅपद्वारे, तर दुसऱ्या टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे तिकिटाची रक्कम अदा करण्याचे नियोजन होते. मात्र ‘यूपीआय’ अॅपच्या पहिल्याच टप्पावरचा प्रवासच अडखळला आहे. दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच या अडचणी सोडविणे आवश्यक आहे.

वायफायच्या रेंजबाबत कधीतरी अडचण येऊ शकते. मात्र सर्वच मशिनमध्ये क्यूआर कोडसंदर्भात अडचण नाही. वाहकांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात येईल. प्रवाशांनी अधिकाधिक प्रमाणात ‘यूपीआय’चा वापर करावा.

- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे

कोल्हापूर ते पुणे शिवशाही बसने प्रवास करीत असताना वाहकाकडे तिकिटाची रक्कम देण्यासाठी ‘यूपीआय’ अॅपचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहकांनी क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याचे सांगितले. रोख रक्कम देऊन तिकीट काढावे लागले.

- नीलेश गुरव, प्रवासी