पुणे (Pune) : राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRTC) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची पूर्व तयारी वेगाने सुरू झाली आहे. मावळ (Maval) आणि मुळशी (Mulshi) तालुक्यातील बाधित २६ गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले. तसेच भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे बोलले जात आहे.
जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामध्ये मावळ आणि मुळशी तालुक्याने आघाडी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यातील २६ गावात भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. हे मूल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना विचारात घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणाऱ्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील भूसंपादन सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात जागामालकांच्या बैठका घेऊन मुल्याकंनाची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले.
रिंगरोडसाठी भूसंपादन करण्यासाठी विभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात आली आहे. दरम्यान मार्चपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी