ST Bus Stand - MSRTC Tendernama
पुणे

MSRTC News : स्वच्छतागृहांच्या ठेकेदारावर ST खरंच कारवाई करणार का?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत असताना एसटी स्थानकांवर मात्र प्रवाशांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्वारगेट आणि वाकडेवाडी येथील एसटी आगार व्यवस्थापक अॅक्शन मोडवर आले आहेत. संबंधित ठेकेदारावर (Contractors) कारवाई करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे.

‘ठेकेदारांनी चोरली पुण्याची स्वच्छ्तागृहे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. पुणे स्टेशनवर असाच प्रकार सुरू आहे. त्याचबरोबर महापालिकेची स्वच्छतागृहेही किळसवाणी असल्याचे मत तेजस सैटवाल यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक स्वच्छतागृह हा अतिशय संवेदनशील विषय आहे. पैसे घेऊन तरी अशी सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ असणे अपेक्षित आहे. लाखोंच्या संख्येने लोक एसटीने प्रवास करत असतात, त्यामुळे अशा ठिकाणांहून रोगराई पसरू शकते.

- श्रद्धा कुलकर्णी, प्रवासी

पुण्यात अशा प्रकारे स्वच्छतागृह चालवणारे बरेच ठेकेदार आहेत. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसस्थानकांच्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. तरच नागरिकांना दिलासा मिळेल.

- वेंकटेश पाटील, नागरिक

फक्त एसटी बसस्थानकावरीलच नव्हे, तर रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहांतसुद्धा हे ठेकेदार प्रवाशांची लूट करतात. शौचालयाचे शुल्क स्वच्छतागृहाबाहेर लिहिलेले असताना देखील हे ठेकेदार दुप्पट शुल्क आकारतात. याबाबत विचारणा केली असता ते जुने शुल्क आहे, असे उत्तर देतात.

- भूषण गोरे, नागरिक

प्रवाशांच्या तक्रारी आल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याबातचा अहवाल विभागीय कार्यालयांकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर काय कारवाई करायची, हे वरिष्ठ ठरवतील.

- ज्ञानेश्वर रणवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, वाकडेवाडी