पुणे (Pune) : रिंगरोडसाठी टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याबरोबरच काम गतीने मार्गी लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्यांची नियुक्त्या अखेर रद्द करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पुणे विभागावर आली आहे. टेंडर वाढीव दराने आल्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. नऊ टप्प्यात करण्यात येणाऱ्या या कामासाठी काढलेले टेंडर हे इस्टिमेट दरापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के जादा दराने आल्या आहेत. त्याबाबतचे वृत्त सकाळने सर्वप्रथम दिले होते. टेंडर वाढीव दराने आल्यामुळे ‘एमएसआरडीसी’पुढील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या रस्त्याचे काम गतीने मार्गी लागावे, तसेच टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, यासाठी प्रत्येक पॅकेजसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारे सहा अभियंत्यांची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु या नियुक्त्या करताना पुणे विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती. परस्पर या नियुक्त्या करण्यात आल्या. ही बाब लक्षात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशाने या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. तसे पत्र महाव्यवस्थापक सतीश भारतीय यांनी मुख्य अभियंता यांना पाठविले आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, टेंडर उघडण्यात आल्यानंतर त्या वाढीव दराने आल्याचे निदर्शनास आले. त्यावरून नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून टेंडर प्रक्रिया राबविताना दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळेच या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रिंगरोडच्या वाढीव दराने आलेल्या टेंडरमुळे ‘एमएसआरडीसी’च्या पुढील अडचणी वाढत चालल्या असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
छाननीचे काम अद्यापही सुरू
रिंगरोडच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजित रकमेपेक्षा वाढीव दाराने टेंडर आल्यामुळे त्यांची छाननी करण्याचे काम टेक्निकल क्षेत्रात काम करणाऱ्या एका त्रयस्थ संस्थेला देण्यात आले आहे. त्या संस्थेकडून अद्यापही ‘एमएसआरडीसी’ला अहवाल प्राप्त झालेला नाही. छाननीचे काम अद्यापही सुरू आहे, असे ‘एमएसआरडीसी’तील अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले आहे.