Ring Road Tendernama
पुणे

Pune : रिंगरोडसाठी 14 गावांतील सुमारे 200 एकरहून अधिक जागा ताब्यात

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडसाठी पूर्व आणि पश्‍चिम भागातील १४ गावांतील सुमारे २००एकरहून अधिक जागा ताब्यात आली आहे. अवघ्या तीन महिन्यात संपादित करावयाच्या एकूण क्षेत्रापैकी दहा टक्क्यांहून अधिक क्षेत्राचे भूसंपादन करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात या रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. पूर्व भागातील मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील ५ आणि भोरमधील ३ गावातून रिंगरोड जाणार आहे. तर पश्चिम भागातील भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील ६ गावांतून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी ४४ गावातील सुमारे साडेसातशे हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.

पाच जुलैपासून पश्चिम मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी बाधितांना नोटिसा देऊन ३० जुलैपर्यंत संमतिपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली. परंतु, पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा आणि अन्य कारणांमुळे ही मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार या मुदतीत १४ गावातील सुमारे दोनशे एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्व भागातील रिंगरोडसाठी चार गावातील तर पश्‍चिम भागातील रिंगरोडसाठी दहा गावातील क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले आहे. या १४ गावातील २३२ गटातील ९३४ खातेदारांना आतापर्यंत भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी २७६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी दिली.

भूसंपादन करण्यात गावांची नावे पुढील प्रमाणे

पूर्व भागातील गावांची नावे : कोरेगाव मूळ, गावडेवाडी, बिवरी, वाडेबोल्हाई

पश्‍चिम भागातील गावांची नावे : कल्याण, खामगाव मावळ,भगतवाडी, रहाटवडे, वडदरे, सांगरूण, बहुली, मोरदरवाडी, थोपटेवाडी, मांडवी बुद्रुक