Pune Tendernama
पुणे

Pune : स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यानच्या मेट्रोचा उद्‌घाटनाचा मुहूर्त ठरला; चांदणी चौक ते हिंजवडी मार्गावरही...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘‘पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चांदणी चौक ते हिंजवडी मार्गावर मेट्रो होण्याची गरज आहे. या मेट्रो मार्गाचा नव्याने समावेश करण्याची सूचना केली आहे. अन्य प्रस्तावित मार्गांना कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा करू,’’ अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (ता. ८) दिली. तसेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटदरम्यानच्या मेट्रोचे ऑगस्टमध्ये उद्‌घाटन होईल, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रोच्या शिवाजीनगर कार्यालयास मोहोळ यांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या कामाची सद्यःस्थिती, प्रस्तावित प्रकल्प व विविध उपक्रमांबाबतची माहिती दिली.

मोहोळ म्हणाले, ‘‘मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशा साडेतीन किलोमीटरच्या टप्प्याचे ऑगस्टमध्ये उद्‌घाटन होणार आहे. दोन स्टेशन आता सुरू होतील, उर्वरित एक स्टेशन नंतर सुरू होईल. येरवडा स्टेशनचेही काम आता पूर्ण होणार आहे. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, एसएनडीटी ते माणिकबाग, हडपसर ते लोणी काळभोर या नवीन प्रस्तावित तीन हजार ७५६ कोटी रुपयांच्या मार्गाचा प्रस्तावही मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये आलेला आहे. त्यास लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. निगडी ते पिंपरी-चिंचवड या साडेचार किलोमीटरचे विस्तारीकरण आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गाचा प्रस्ताव आहे, हे विषय कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी आलेले आहेत. त्यास लवकरच मान्यता कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करू.’’