पुणे (Pune) : एकेकाळी अवघ्या देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या व कालौघात दुर्लक्ष होत असलेला शनिवारवाडा आता कात टाकणार आहे. शनिवारवाड्याच्या डागडुजीपासून ते गतवैभव अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याची पाहणी केली. त्याबाबतचा प्रस्ताव पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाला सादर करणार आहेत.
कुलकर्णी यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता शनिवारवाड्याची पाहणी केली. यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक मोहन शेट्ये, मंदार लवाटे, लेखक व इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, निनाद पटवर्धन, रश्मीन कुलकर्णी, भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे, ओंकार गरुड, वास्तुविशारद प्रचित कलमदाणी आदी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘शनिवारवाड्याची डागडुजी करण्यापासून ते दुर्मिळ चित्र, त्यावेळेचे वृक्ष, फुलझाडे पुन्हा कसे लावता येतील, होलोग्रामद्वारे शनिवारवाड्याचे दृकश्राव्य चित्र दाखविणे यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरेसा निधी, विविध परवानग्यांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.’’ दरम्यान शनिवारवाड्यात साचलेला कचरा, प्लॅस्टिक बाटल्यांचा वापराबाबत कुलकर्णी यांनी प्रशासनाला खडसावून तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.