MNGL Tendernama
पुणे

सीएनजी वाहनचालकांनो व्हा निश्चिंत! पुण्यात ६ ठिकाणी होणार नवे पंप

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘सीएनजी’ (CNG) वाहन चालकांची डोकेदुखी आता कमी होणार आहे. कारण, ‘एमएनजीएल’ने (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) (MNGL) पुण्यातील सीएनजी स्टेशनची (पंप) संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात सहा पंप नव्याने उभे करणार असून, पाच ते सहा पंपाचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे रोज किमान १५ हजार वाहनचालकांची सोय होणार आहे. त्यामुळे त्यांना रांगेत थांबावे लागणार नाही. धनकवडी, कात्रज आदी परिसरात हे नवे पंप सुरू होत असल्याची माहिती ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत पंपाची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे दिवसभर अनेक सीएनजी पंप वाहनाच्या विशेषतः रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसतात. हेच चित्र आता काही प्रमाणात तरी बदलणार आहे. कारण, एमएनजीएल पुण्यात नवे सहा पंप उभे करीत आहे. तर तेवढेच पंप अपग्रेड करीत आहे. त्यामुळे सुमारे सहा पंपांवरील फिलिंगचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परिणामी, सीएनजीच्या उपलब्धतेत वाढ होणार आहे. पंपाची क्षमता वाढल्याने वाहनचालकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. याचा थेट फायदा वाहन चालकांना होणार आहे.

या ठिकाणी होणार नवे पंप :
नानापेठ, धनकवडी, कात्रज, बालेवाडी, हांडेवाडी, बाणेर या सहा ठिकाणी नवीन पंप होत आहेत. यांसह १० ते १२ जुन्या स्टेशनचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. यातील सहा पंप हे पुण्यातील आहेत तर इतर पिंपरी चिंचवड परिसरातील आहेत.

अपग्रेडेशनचा फायदा काय :
सध्याच्या पंपावरील यंत्रणेत सीएनजी भरण्यासाठी टँकरचा वापर केला जातो. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. तसेच यात दिवसभरात तीन ते चार हजार किलो सीएनजी स्टेशनमध्ये भरला जातो. मात्र पंप ऑनलाइन झाल्यावर एका पंपावर सुमारे १० हजार किलो सीएनजी पाईपलाईनच्या माध्यमातून भरला जातो. यामुळे एका पंपास जवळपास सहा हजार किलो अतिरिक्त सीएनजीचा पुरवठा होतो. त्यामुळे वाहन धारकांची सोय होणार आहे.

सीएनजीबाबत पुण्यातील स्थिती
१००
जिल्ह्यातील एमएनजीएलचे पंप
५०
सध्या पुणे शहरातील पंप

नवे सुरु होणार (पुणे)

अपग्रेड होणार (पुणे)
५.५० लाख किलो
रोजची सीएनजी विक्री
३ लाख
पुण्यातील वाहनांची संख्या
९७ हजार
रिक्षाची संख्या