Shatabdi Express 
पुणे

रेल्वेचे मिशन सक्सेसफूल; यामुळे पहिल्याच दिवशी 'शताब्दी' हाऊसफूल!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : तब्बल अडीच वर्षानंतर सुरू झालेल्या पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. बुधवारी (ता. १०) पहिल्याच दिवशी पुण्याहून ८१४ प्रवाशांनी प्रवास केला. व्हिस्टाडोम कोचमध्ये ४४ सिटपैकी ४० सिट बुक झाल्या होत्या. गाडीला ९५. ३२ टक्के प्रतिसाद लाभला. (Pune - Hyderabad Shatabdi Express - Vistadome Coach)

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेससह अन्य रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. दरम्यानच्या काळात रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे सुरू केल्या. मात्र शताब्दी एक्स्प्रेस सुरू केली नव्हती. पुणे - सिकंदराबाद ही मध्य रेल्वेची एकमेव शताब्दी रेल्वेगाडी आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत होती.

अखेर रेल्वे प्रशासनाने १० ऑगस्ट पासून ही रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी पहिल्याच दिवशी गाडी प्रवाशांनी भरून धावली. चेअर कार व व्हिस्टाडोम डब्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. सोलापूर, कलबुर्गी स्थानकावरून देखील प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

व्हिस्टाडोम डब्यातून प्रवास
मध्य रेल्वेने चार रेल्वेला जोडलेल्या व्हिस्टाडोम डब्यातून अवघ्या चारच महिन्यांत ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेला सुमारे ४ कोटी ९९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या चार रेल्वेला व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. बुधवारी धावलेल्या पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पाचवा डबा जोडण्यात आला. त्याला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला.