पुणे (Pune) : पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्य सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च करण्यास सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले.
पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे वाहतुकीचे परिचालन चांगल्या प्रकारे व्हावे, रेल्वे गाड्यांची संख्या वाढावी तसेच हा प्रवास जलद व्हावा यासाठी पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका होणे अत्यंत आवश्यक आहे. हा प्रकल्प राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय एकत्रितरीत्या करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) यांना या संदर्भात फेर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘एमआरव्हीसी’ने सुधारित ‘डीपीआर’ सादर केला. त्यानंतरदेखील पुणे-लोणावळा प्रश्नी फारशी चर्चा झाली नाही. मोहोळ यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा प्रकल्पाविषयी चर्चा सुरू झाली आहे.
पाच वर्षांत वाढले २१६ कोटी
पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून पाच वर्षे झाली. त्यानंतर सुधारित अहवाल देखील राज्य सरकारला देण्यात आला. या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च पाच वर्षांपूर्वी ४,८८४ कोटी रुपये इतका होता. तो आता ५१०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. पाच वर्षांत प्रकल्पाची किंमत २१६ कोटी रुपयांनी वाढली.
नव्या मार्गिकेचा फायदा काय?
- नवीन दोन मार्गिका टाकल्यावर पुणे ते लोणावळा दरम्यान एकूण चार मार्गिका होतील
- नवीन मार्गिकेवरून मेल एक्स्प्रेस व मालगाडी धावतील
- सध्याच्या मार्गिकांवरून लोकल धावतील
- लोकल व मेल एक्स्प्रेस स्वतंत्र धावणार असल्याने त्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही
- अतिरिक्त मार्गिकांमुळे क्षमता वाढेल, परिणामी रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल
- प्रवाशांचा वेळ वाचेल.
पुणे-मुंबई हा अत्यंत व्यस्त रेल्वे मार्ग आहे. रेल्वे प्रवास जलद व रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यासाठी या मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका असणे आवश्यक आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री