Hospital Tendernama
पुणे

मंत्री मुश्रीफांची मोठी घोषणा; ससून परिसरात होणार 'या' रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ससून रुग्णालयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, विश्वजित कदम, अशोक पवार यांनी भाग घेतला.

मुश्रीफ म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी असून उपचारांसाठी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्यःस्थितीबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही ‘एमपीएससी’मार्फत करण्यात येत आहे. गट ‘क’ मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट ‘ड’ पदाची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत’’.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहेत. औषधे न मिळाल्याने रुग्णांवर संकट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ससूनच्या कारभाराविषयी विधिमंडळात होणार चर्चा

‘ससून रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे’, हा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्यावर सर्वपक्षीय आमदारांनी आक्षेप घेताच ससूनच्या कारभाराविषयी या अधिवेशनातच चर्चा घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. ती मान्यही करण्यात आली. गेल्या काही दिवसांत ससून रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहारांचा पाढा सभागृहात वाचण्यात आला. ससून हे उत्तम रुग्णालय आहे असा दावा करतानाच गेल्या काही दिवसांत झालेल्या घटना मात्र दुर्दैवी असल्याचे मुश्रीफ यांनी मान्य केले. ससूनमध्ये होणाऱ्या डायलिसिसची संख्या वाढावी, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या. आमदार रवींद्र धंगेकर, माधुरी मिसाळ यांनी रुग्णालयाबद्दल प्रश्न उपस्थित केले.