पुणे (Pune) - 'नियोजित पुणे-नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्गाला जुन्नर, आंबेगाव, शिरूर व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध लक्षात घेता हा महामार्ग रद्द होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फाईलवर स्वाक्षरी झाली आहे. येत्या चार-पाच दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य शासन रस्ता रद्द झाल्याची अधिसूचना काढणार आहे'. अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता आंबेगाव) येथे रविवारी(ता.१५) रात्री पुणे-नाशिक औद्योगिक उद्योग महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने नियोजित महामार्ग रद्द व्हावा याबाबत आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वळसे पाटील यांच्यावर बरोबर चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी, समन्वय वल्लभ शेळके, जी. के. औटी, एम.डी घंगाळे, मोहन नायकोडी, प्रतीक जावळे, काठापूरचे सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, कान्हू करंडे, दिलीप जाधव, सुरेश बोरचटे, निवृत्ती करंडे, हेमंत करंडे, अविनाश आठवले, गोविंद हाडवळे आदी शेतकरी होते. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या.
'सध्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे. पण नव्याने समांतर रस्ता करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे २०१३ च्या केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी. राज्य सरकारने याबाबत तोडगा न काढल्यास संघर्ष समितीच्या वतीने बाधित गावांमध्ये तहसीलदार कचेरी,आमदार, खासदार मंत्री यांच्या कार्यालय व घरापुढे शांतता मार्गाने आंदोलन उपोषण व मुंबई मंत्रालय येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.' असा इशारा बाळासाहेब औटी यांनी दिला.
'आंबेगाव, जुन्नर, शिरूर,संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.त्यांचा रस्त्याला विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे. मी व आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. पवार यांनी पुढाकार घेतला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने सुरु केलेले आंदोलन थांबवावे'.
- दिलीप वळसे पाटील-सहकारमंत्री