पुणे (Pune) : राज्यातील सुमारे ५० बस स्थानके अद्ययावत केली जाणार आहेत. त्यामुळे बस स्थानकांचे चित्र पालटणार असून प्रवासी सुविधेत वाढ होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कामांना सुरवात होईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसटी बसेसमध्ये काळानुरुप बदल झाला. मात्र, बस स्थानकांत फारसे बदल झाले नाही. त्यामुळे बस स्थानके अद्ययावत करणे गरजेचे आहे. प्रवाशांना आवश्यक असणारी सर्व माहिती त्यांना बस स्थानकावर उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचा विचार करूनच बस स्थानकांवर सुविधा पुरविण्यात येतील, असे परब यांनी सांगितले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
'बसपोर्ट' आम्ही करणारच
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्टची संकल्पना मांडली होती. याबाबत परब म्हणाले, ‘‘ही संकल्पना चांगलीच आहे. यात औरंगाबाद व पनवेल बस स्थानकांची निवड झाली. मात्र, काही तांत्रिक बाबींना मान्यता मिळाली नाही. त्यामुळे बसपोर्टचे काम सुरू झाले नाही. मात्र, बसपोर्टमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे ही संकल्पना आम्ही पुढे नेऊ.’’
मेट्रोशी चर्चा सुरु
शिवाजीनगर बस स्थानकाविषयी मेट्रोशी आमची चर्चा सुरु आहे. जे करारात होते, त्याप्रमाणेच होईल. मात्र, याबाबत आणखी कोणता ठोस निर्णय झाला नाही. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे परब यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक प्रवासी सेवा
राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा आता पर्यावरणपूरक होत आहे. पहिल्या टप्प्यांत १५० ई-बस दाखल होत आहे. त्यानंतर येत्या दीड ते दोन वर्षात सुमारे तीन हजार ई-बस महामंडळ घेणार आहे. यांसह सीएनजीवर धावणाऱ्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार डिझेल बसेसचे सीएनजीमध्ये रूपांतर केले जाईल. त्यानंतर सीएनजीवर धावणाऱ्या दोन हजार बसेस महामंडळात दाखल होणार आहेत.