Phursungi, Uruli Devachi Tendernama
पुणे

Pune : फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांतील टीपी स्कीमचे भवितव्य अंधारात, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांत प्रस्तावित केलेल्या तीन नगररचना योजनांचे (टीपी स्कीम) भवितव्य अंधारात आले आहे. या तिन्ही योजना अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना गावेच वगळल्याने महापालिकेने त्यावर केलेला खर्च आणि श्रम वाया जाणार का, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगर परिषदा त्याची अंमलबजावणी करणार का, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या गावांपैकी फुरसुंगी येथे दोन आणि उरुळी देवाची येथे एक टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार उरुळी देवाची गावात १०९ हेक्टरवर तसेच फुरसुंगी येथील २६०.६७ हेक्टरवर एक आणि २७९.७१ हेक्टरवर दुसरी टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लॉकडाऊनमुळे या योजना राबविण्यास राज्य सरकारने मुदतवाढ दिली होती. महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना फुरसुंगी येथील २६० हेक्टर आणि उरुळी देवाची येथील १०९ हेक्टरवरील टीपी स्किमच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर करून त्यास मान्यता घेण्यात आली तर फुरसुंगी येथील २७९.७९ हेक्टरवरील टीपी स्कीममधील क्षेत्रफळात दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. ती दुरुस्ती करून प्रारूप योजना जाहीर करण्यास मान्यता दिली. त्यानंतर या नगररचना योजना अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविल्या. त्यानंतर उरुळी देवाची येथील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने निविदा काढून ठेकेदारांची नियुक्ती केली. आता ही गावे वगळण्याचा निर्णय घेतल्याने या योजनांचे काम होणार का, नव्याने अस्तित्वात आलेली नगर परिषद त्यांची अंमलबजावणी करणार का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

सरकारच्या निर्णयामुळे जागेलाही खो

पीएमआरडीएने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. जागेचे भूसंपादन करणे सोयीचे व्हावे, यासाठी या रस्त्याच्या कडेने १४ ठिकाणी टीपी स्कीम प्रस्तावित केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगीच्या दोन आणि उरुळी देवाची येथील एक अशा तीन टीपी स्कीम महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यानुसार महापालिकेने या योजना तयार करून त्यांचे प्रारूप जाहीर करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे रिंगरोडसाठी आवश्‍यक असलेली जागा या माध्यमातून मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे त्यालाही खो बसला आहे.

स्वतंत्र आदेश काढण्याची गरज

महापालिकेतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये महापालिकेने तयार केलेल्या टीपी स्कीमची अंमलबजावणी करावयाची झाल्यास, ती या नगर परिषदांमार्फत होऊ शकते. परंतु त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढण्याची गरज आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.