Nagar Road Tendernama
पुणे

Pune-Nagar Road : पुणे-शिरूर टप्प्यातील कोंडी फुटणार; समृद्धी महामार्गही पुण्याला...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे पुणे ते शिरूर हमरस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. त्याबरोबर शिरुर ते नगर बाह्यवळण रस्त्याच्या कामामुळे समृद्धी महामार्गही पुण्याला जोडला जाणार आहे.

नगर रस्त्यावर पुणे-शिरूर या टप्प्यात होणारी कोडींची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, नॅशनल हायवे ऑथोरीटी यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला पुणे-शिक्रापूर या टप्प्यात २५ किलोमीटरचा सलग उड्डाणपुलाचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पुणे-शिक्रापूर या टप्प्यात कोडींच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचाही विचार झाला. या पुणे-शिरूर दरम्यान सहा पदरीकरणाचे काम झाल्याने कोंडीतून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे ते शिरुर सलग दुमजली उड्डाणपुलाचा विचार केला. त्यानुसार ७ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देवून ७, ५४७.६० कोटी रुपयांच्या तीन टप्प्यांत टेंडर प्रक्रियाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राबविली. मात्र, तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असतानाच अचानक या टेंडर प्रक्रिया रद्द केल्या, आणि हा प्रकल्प राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग केला.

दरम्यान, नगर रस्त्यावरील रोजच्या कोंडीतून नागरिकांची मुक्तता व्हावी, यासाठी विविध घटकांचाही सातत्याने पाठपुरावा शासनाकडे सुरू होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पुणे-शिरुर-नगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नगर रस्त्यावर पुणे ते शिरूर हा ५३ किलोमीटरचा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून ‘एमएसआयडीसी’मार्फत हे काम केले जाईल. यासाठी सात हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरूर-नगर बाह्यवळण रस्ता, छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी दोन हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर ते नगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच नगर ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो ‘एमएसआयडीसी’ला हस्तांतरित करण्यात येईल. देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत असल्याने कालावधी संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग ‘एमएसआयडीसी’ला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

टेंडर प्रक्रियेबाबत अधिकारीच अनभिज्ञ

नव्या निर्णयानुसार पुन्हा नव्याने प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला जाणार आहे की, जुन्याच अहवालानुसार नुसार काम होणार आहे. तसेच पुन्हा टेंडर केव्हा काढले जाणार याबाबतही अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. नगर रस्त्यावरील वाढत्या कोंडीमुळे येणारा ताण अन् त्यातच या प्रकल्पात सतत होणाऱ्या बदलांबाबत संबंधित अधिकाऱ्यांमध्येही नाराजीचा सुर आहे.