Mandai, Pune Tendernama
पुणे

पुण्यातील महात्मा फुले मंडईचा बदलणार चेहरामोहरा; आराखड्यात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट करण्यासाठी पुणे मेट्रो (Pune Metro) आणि महापालिकेने एक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मंडईत खुले थिएटर होणार असून परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ असेल. तसेच हेरिटेज वॉकही सुरू करण्यात येणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ लागेल.

मेट्रो आणि महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याबाबतच्या करारावर महापालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे मेट्रोतर्फे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. यासाठी ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो आणि महापालिका तो खर्च करणार आहे. मंडई परिसरात महात्मा फुले मंडई आणि बुधवार पेठ (कसबा पेठ) येथे भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. त्यामुळे पादचारी आणि पर्यटकांना सुविधा देण्यासाठी हा बदल होणार आहे.

येथे होणार हेरिटेज वॉक
कसबा पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ या परिसरात लालमहाल, शनिवार वाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग आदी ऐतिहासिक वास्तूंना जोडण्यासाठी हेरिटेज वॉक सुरू होणार आहे.

मंडई परिसरात हा होणार बदल
- हेरिटेज वॉक सुरू होणार, त्यात सेल्फ गाइडेड ऑडिओ टूरचा समावेश
- बस थांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी पार्किंग यांच्यासाठी उपाययोजना
- पादचारी मार्ग आणि भूमिगत पादचारी मार्ग
- टिळक पुतळ्याच्या बाजूला नव्या भवनात १४२ व्यावसायिकांचे पुनर्वसन
- कांदा-बटाट्यांच्या गाळ्यांवर खुले थिएटर
- मंडईच्या मुख्य वास्तूच्या बाजूला ‘पादचारी झोन’
- या भागात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद

कधी सुरू होणार काम
- महात्मा फुले मंडईतील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. दरम्यानच्या काळात टप्प्याटप्प्याने आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू होणार आहे.

मेट्रो प्रकल्पामुळे मंडईतील १४२ व्यावसायिक विस्थापित झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन नव्या इमारतीत होईल. या पुढे कोणालाही विस्थापित केले जाणार नाही, अशी माहिती मेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

संपूर्ण महात्मा फुले मंडई पादचारी पूरक करण्यात येणार आहे. स्थानकांच्या विकासाव्यतिरिक्त मेट्रो स्थानकांभोवतीच्या परिसराचाही विकास करू. महापालिकेच्या सहकार्यातून हा आराखडा तयार झाला आहे. त्यातून परिसरात मोठे बदल होतील.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो