पुणे (Pune) : येरवडा-लोहगाव मार्गावरील गोल्फ चौकात रस्त्याची चाळण झाल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, हा मार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
महिना दीड महिन्यापूर्वी शहरात ‘जी-२०’चे आयोजन करण्यात आल्याने महापालिकेच्या वतीने येरवडा-लोहगाव मार्गावरील भिंतीसह रस्त्यांची कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती. मात्र, यास महिना दोन महिन्यांचा कालावधी लोटला नाही, तोच गोल्फ चौक परिसरात असणाऱ्या मार्गावर अक्षरशः खड्डे पडल्याने या मार्गावरून जाताना वाहनचालकांना कसरत करूनच वाहन चालविण्याची वेळ येत आहे. त्यातच ‘जी-२०’ पार्श्वभूमीवर बसविण्यात आलेले पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने नेहमीच छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. पडलेल्या खड्ड्यांलगतच महापालिकेची शाळा असल्याने या मार्गावरून जाताना शालेय विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
येरवडा-लोहगाव मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असल्याने खड्ड्यातून मार्ग कसा काढावा, हा मुख्य प्रश्न वाहनचालकांना अनेकदा सतावत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून किरकोळ अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पादचारी, नागरिकांना या मार्गावरून जाताना जीव मुठीत घेऊनच जाण्याची वेळ येत आहे.
यासंदर्भात रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी मात्र मुख्य समस्येकडे पाठ फिरवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन गोल्फ चौक परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. याबाबत येरवडा-धानोरी-कळस क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंता चंद्रसेन नागटिळक व सहायक आयुक्त इंद्रायणी करचे-गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.