Pune Tendernama
पुणे

Good News : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला येणार गती; आवश्‍यक जमिनींची मोजणी पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता (Katraj-Kondhwa Road) रुंदीकरणाच्या कामाला आता आणखी गती येण्याची शक्‍यता आहे. अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर कात्रज गावातील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक जमिनींच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तब्बल १०० मिळकतींच्या मोजणी प्रक्रियेचा सविस्तर भूमापन अहवाल भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेकडे पाठविण्यात आला आहे. आता कोंढवा बुद्रूक येथील बाधित जमिनींच्या मोजणीचे कामही लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. विकास आराखड्यातील ८४ मीटर असलेला हा रस्ता ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, मालमत्ताधारकांकडून प्रारंभी जमिनी देण्यास होणारा विरोध, जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात मिळण्याची करण्यात येत असलेली मागणी, विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम डिसेंबर महिन्यापासून अडखळत सुरू होते. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात मालमत्ताधारकांशी संवाद साधून रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली होती.

कात्रज येथील राजस सोसायटी चौक ते पिसोळी गाव या विकास आराखड्यातील रस्त्याचे भूमापन करण्यासंदर्भात महापालिकेकडून हवेलीच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. महापालिकेचा पथ विभाग, मालमत्ता विभाग व हवेली भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून जमीन मोजणीचे संयुक्त कामास सुरवात करण्यात आली. भूमी अभिलेख उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन दिवसात जमीन मोजणीचे काम करण्यात आले. त्यानंतर सविस्तर भूमापन अहवाल महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आला. कात्रज गावातील सर्व्हे नंबर १२ मधील रस्ता रुंदीकरणासाठीच्या बाधित क्षेत्राची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये एक गुंठ्यापासून ते आठ, दहा गुंठे अशा एकूण १०० मालमत्तांच्या जमिनींची मोजणी करण्यात आली. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला गती येणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी १४० कोटी रुपये मंजूर केले आहे, तर महापालिकेने ७० कोटी रुपयांची तरतूद ठेवलेली आहे.

भूमापनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

कात्रज गावातील रस्ता रुंदीकरणासाठी बाधित १०० मिळकतींची मोजणी रोव्हर आणि सीओआरएस या जमीन मोजणीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन मोजण्यात आली. या जमीन मोजणीसाठी १५ दिवसांचा कालावधी लागू शकत होता. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हे काम अवघ्या तीन दिवसांतच पूर्ण झाले, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांनी दिली.

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणामध्ये कात्रज येथील जमीन ताब्यात घेण्याची किचकट प्रक्रिया पार पडली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. आता जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन अहवालही प्राप्त झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाला आता चांगली गती मिळणार आहे.

-अनिरुद्ध पावसकर, पथविभागप्रमुख, महापालिका

महापालिकेचा पथ, मालमत्ता व भूमी अभिलेख विभाग या तिन्ही विभागांनी चांगले काम केले. त्यामुळे जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे.

- महेश पाटील, उपायुक्त, मालमत्ता विभाग, महापालिका