पुणे (Pune) : लोणावळा-कर्जत दरम्यान असणाऱ्या घाट विभागामधील नव्या मार्गिका या समतल बनविण्याचा विचार आहे. दोन नव्या मार्गिकांसोबतच काही नवे बोगदे देखील तयार केले जाईल. आताच्या मार्गिकांसारखे चढ-उतार नसल्याने नव्या मार्गिकांवरून रेल्वे धावताना त्यांना बँकरची अथवा वेग कमी करण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय दरडी पडल्याने विस्कळित होणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटेल. यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुसाट होईलच शिवाय अडथळे देखील नसतील. घाटात दोन नव्या मार्गिका झाल्यास या विभागामध्ये एकूण पाच मार्गिकांवरून रेल्वे वाहतूक सुरु होईल. कोकण रेल्वे या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम करीत आहेत.
म्हणून घेतला निर्णय...
- पावसाळ्यात अनेकदा बोरघाटात दरडी कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळित होते.
- याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना व प्रशासनाला बसतो.
- कर्जतहून लोणावळ्याच्या दिशेने येताना चढण आहे.
- त्यामुळे रेल्वे गाड्यांना बँकर जोडावे लागते.
- सातत्याने प्रवासी रेल्वे व मालगाडी धावत असल्याने लोणावळ्याहून कर्जतकडे जाणाऱ्या मार्गिकांवर ताण येऊन रुळांची झीज होते.
- यातून अपघाताचा धोका देखील असतो.
- या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोणावळा-कर्जत दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला.
आधी ‘राईट्स’ आता कोकण रेल्वे
नवीन रेल्वे मार्ग होत असताना त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजदाद करणे व अन्य कामांसाठी रेल्वेची ‘राईट्स’ ही संस्था काम करते. मागच्या वर्षी याच संस्थेला लोणावळा-कर्जत दरम्यान चौथी व पाचवी मार्गिका टाकण्यासाठी डीपीआरचे काम दिले होते. मात्र घाटातील काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने मध्य रेल्वेच्या बांधकाम हे काम आता कोकण रेल्वेला दिले आहे. मात्र ‘राईट्स’ने दिलेल्या अहवालात या मार्गावर दहा नव्या ठिकाणी बोगदा बांधण्यास सुचविले होते. जिथे दरडी जास्त पडतात त्याच ठिकाणी हे नवे बोगदे बांधण्याचा विचार मांडला होता. आता या विषयांत प्रावीण्य असलेल्या कोकण रेल्वेलाच ‘डीपीआर’चे काम करायचे आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत हे अधिक चांगले व गतीने होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. सहा महिन्यांत ‘डीपीआर’ तयार होईल असा अंदाज मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
नव्या मार्गिकाचा फायदा
- लोणावळा-कर्जत मध्ये जर दोन नव्या मार्गिका असतील. तर त्याचा खूप मोठा फायदा रेल्वे वाहतुकीला होईल.
- गाड्यांची संख्या वाढेल, गाड्यांचा वेग कमी करावे लागणार नाही.
- कर्जत-लोणावळा दरम्यान गाड्यांना बँकर लावावे लागणार नाही.
- दरडी कोसळून अथवा एखाद्या मार्गावर रेल्वे अपघात झाला, तर दुसऱ्या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरु राहील.
- नव्या मार्गिका समतल असल्याने रुळांचे आयुर्मान अधिक राहील.
- प्रवासी सेवा बाधित होणार नाही.
सध्या याचे काम सर्व्हेच्या स्तरावर आहे. जेव्हा सर्व्हे पूर्ण होईल. तेव्हा रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळेल. अद्याप तरी याला मंजुरी मिळालेली नाही.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई