Pune Tendernama
पुणे

Katraj Kondhwa Road News : ठेकेदाराचा निष्काळजीपणा; 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी काय केली कारवाई?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ग्रेडसेपरेटरसाठी (समतल विलघक) खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खडीमशिन चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर (Contractor) कलम ३०४-अ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी घडलेल्या या प्रकरणी जगदीश छगन शिलावट (वय ३५) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील महाकाली मंदिराजवळील ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्याला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षाविषयक बाबीचे पालन न करण्यात आल्यानेच ही घटना घडली असल्याचे कारण देत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा खड्डा रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराने खोदला असून, खड्ड्यास कोणताही संरक्षक कठडा किंवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच खोदलेल्या खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात बुडून मुस्कान शिलावट (वय १६) या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाइकाच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद केला असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.