Katraj Chowk Flyover Tendernama
पुणे

Pune : कात्रज चौकातील उड्डाणपूल अडकला समस्यांच्या गर्तेत; पोलिसही हतबल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज चौकातील उड्डाण पूल वाहतूक कोंडीसह इतर समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला ब्रेक लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या समस्यांची कोंडी फोडून काम पुढे घेऊन जाण्यासाठी महापालिका, पीएमपी आणि वाहतूक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे गर्डर टाकण्याचे काम मुख्य चौकात आले आहे. हे काम करण्यासाठी वाहतूक वळविणे गरजेचे असून, वाहतुकीला पर्यायी व्यवस्था नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक वळविण्याची दोनवेळा चाचण्या घेतल्यानंतर आता वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून त्रुटींवर अभ्यास सुरू आहे. दोन्ही चाचण्यांच्या वेळी आढळून आलेल्या त्रुटींवर काम करून लवकरच पुढील काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून देण्यात आली आहे. उड्डाण पुलाच्या कामाची मुदत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये संपल्यानंतर पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र विविध अडचणींचा सामना करत असताना या उड्डाण पुलाचे काम डिसेंबरमध्येही पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अडचणींवर मात करत उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

तातडीने या उपाययोजना आवश्यक

- आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविणे

- पर्यायी रस्त्यांची गरज

- कात्रज चौकातील वादात असलेल्या जागांचे भूसंपादन तातडीने करणे

- चौक, पर्यायी रस्ते आणि आजूबाजूच्या परिसरातील अतिक्रमणे हटविणे

- स्वारगेटला आणि स्वारगेटवरून सातारामार्गे जाणाऱ्या एसटी बस काही काळासाठी नवले पुलामार्गे वळविणे

- बहुसंख्य पीएमपी बस कात्रज चौकात न येऊ देता विभाजन करून मोरेबाग, कात्रज डेअरी, कात्रज डेपो परिसरातून परत वळविणे

- नवले पुलाकडून स्वारगेट परिसरात जाणारी वाहने वंडरसिटी कात्रज डेअरीमार्गे वळविणे

- सातारा रस्ता परिसरातून कोंढव्याकडे जाणारी वाहने गुजरवाडी फाट्यावरून वळविणे

- साताऱ्याकडून येणारी स्वारगेटच्या बाजूला येणारी सर्व वाहने कात्रज घाटातून चौकात येऊ न देता नवले पुलमार्गे वळविणे

दोनवेळा प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक वळवून पाहिली आहे. आता विविध शक्यतांची चाचपणी करण्यात आली आहे. या तपासणीनंतर विविध शक्यता समोर आल्याने काय उपायोजना करायला हव्यात, याचा अंदाज आला आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आम्ही आणखी एक चाचणी घेऊ, त्यानंतर पुलाचे पुढील काम सुरू करण्यात येईल.

- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

उड्डाण पुलाच्या कामासाठी चौकातील रखडलेल्या जागांच्या भूसंपादनासह विविध समस्यांचे चक्रव्यूह भेदणे अत्यंत गरजेचे आहे. यात अग्रक्रमावर भूसंपादन हे असून, चौकातील भूसंपादनाअभावी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका भूसंपादन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ही नामुष्की ओढावली आहे. मुख्य चौकातील बहुचर्चित गुगळे प्लॉटच्या ४० गुंठे जागेचा दीड वर्षापूर्वी निर्णय होऊनही जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. चौकातील खांबांवर गर्डर टाकण्यासाठी ही जागा ताब्यात घेऊन वाहतूक वळविणे गरजेचे आहे. त्याशिवाय काम करणे कठीण आहे. चौकात रस्ता रुंदीकरणाअभावी प्रचंड वाहतूक कोंडी होते.

वाहतूक पोलिसही हतबल

कात्रज चौकातील वाहतूक कोंडीमुळे पोलिस हतबल झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४३ आहे. यातील सुटीवर आणि कार्यालयीन कामासाठी १० ते ११ कर्मचारी असतात. उर्वरित १४ ते १५ पोलिस कात्रज चौक परिसरात असतात, तर चौकाच्या पर्यायी वाहतूक परिसरात म्हणजेच राजस चौक, वंडरसिटी चौक, दत्तनगर भुयारी मार्ग, सरहद चौक, कात्रज डेअरी, त्रिमूर्ती चौक अशा परिसरात ११ ते १२ कर्मचारी असतात. कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा ताण दूर करण्यासाठी ३२ पैकी सुमारे २५ कर्मचारी काम करतात. परंतु, कोंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे त्यांची संख्या कमी पडते.