Pune 
पुणे

पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी सहा कंपन्यांनी भरले टेंडर

प्रकल्पाचा खर्च ९९५ कोटींवरून १५११ कोटी

टेंडरनामा ब्युरो

पुणे : शहरातील मैलापाण्यावर शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जायका’ प्रकल्पासाठी निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर आता ‘अ’ पाकिट उघडण्यात आले असून, यामध्ये सहा कंपन्यांनी या प्रकल्पाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर सर्वात कमी रक्कम कोणत्या कंपनीने प्रस्तावित केली आहे हे स्पष्ट होणार आहे.

मुळा-मुठा नदीत येणारे मैलापाणी शुद्ध करण्यासाठी जपान येथील ‘जायका’ कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. २०१५ ला प्रकल्प मंजूर करण्यात आला. यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ‘जायका’ने निश्‍चित केलेल्या नियम, अटींमध्ये बदल करून निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास आक्षेप घेण्यात आल्याने ती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या. या गोंधळात या प्रकल्पाला सहा वर्ष उशीर झाला झाल्याने तो अद्यापही कागदावरच आहे. या काळात प्रकल्पाचा खर्च वाढला असून, ९९५ कोटी वरून १५११ कोटी इतका खर्च झाला आहे त्यामुळे महापालिकेवर सुमारे ७०० कोटीचा भार निर्माण झाला आहे.

महापालिकेने दुसऱ्यांना निविदा मागविल्या असताना त्यात एक हजारापेक्षा जास्त तांत्रिक चुका होत्या. त्या दुरुस्त करण्याची सूचना ‘जायका’ सह ठेकेदारांनी केल्या होत्या. दरम्यान, निविदा भरण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट होती, पण युरोपात कोरोनाची साथ वाढल्याने कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ‘जायका’ने एका आठवड्याची मुदत वाढवून दिली. ही मुदत आज संपली असता यात ६ कंपन्यांनी निविदा भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सहा कंपन्यांचे ‘अ’ पाकिट उघडण्यात आले आहे. त्यामध्ये कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जाते, त्यात ती पात्र ठरल्यास त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी निविदेत भरलेली रक्कम बाहेर येईल. महापालिकेची समिती व जायका कंपनीकडून छाननी होण्यास किमान एका महिन्याचा कालावधी लागेल, असे मलनिःसारण विभागाचे अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे यांनी सांगितले.

या आहेत सहा कंपन्या

१ - मे. टाटा प्रोजेक्ट्स प्रा. लि व पी अँड सी प्रोजेक्ट्स-कन्सोरशिअम

२ - मे. एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन्स-जेव्ही

३ - मे. व्हीए टेक वाबाग व पी. सी.आय.एल-जेव्ही

४ - मे. एल अँड टी व के.आय.पीएल-जेव्ही

५ - मे. जे.एम.सी व मेटीटोव अल्के -जेव्ही

६ - मे. जे. डब्ल्यू.आय. एल व एस.एस.जी व एस. पी.एम.एल- जेव्ही