पुणे

बारामतीत रेल्वेच्या डब्यात मिळणार पाहूणचार! लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मध्य रेल्वेने यापूर्वी मुंबई आणि नागपूर स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मध्य रेल्वेकडून लवकरच आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्यात येणार आहेत. हॉटेल, पण सर्व काही रेल्वेच्या डब्यासारखेच. रुळावर उभारण्यात येणाऱ्या या हॉटेलमधील सीट, खिडक्या सर्व काही रेल्वेसारखेच. त्यात नागरिकांना चक्क रेल्वेत बसून जेवण केल्याचा वेगळा अनुभव घेता येणार आहे. (Central Railway Started Restaurant On Wheels at Mumbai And Nagpur Station)

‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ हे रेल्वेवर बसवलेले सुधारित कोच असून, याठिकाणी भोजनाचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’चे आतील भाग आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहेत. त्यात रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेऊ शकतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही महत्त्वाची खाण्यापिण्याची ठिकाणे बनली आहेत. हे रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून अनुक्रमे सव्वालाख आणि दीड लाख नागरिकांनी भोजनाचा आनंद घेतला आहे.

मध्य रेल्वेने आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, चिंचवड स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान या सात ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’चे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ही संकल्पना प्रवाशांना अनुकूल असून, त्यातून रेल्वेला महसूलही मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.