Big Transactions Tendernama
पुणे

मोठ्या रकमेचे व्यवहार करताय! मग हे वाचाच; 20 लाखांहून अधिकच्या...

टेंडरनामा ब्युरो

नवी दिल्‍ली (New Delhi) : प्राप्‍तिकर विभागाने (Income Tax Department) लागू केलेल्‍या नव्‍या नियमानुसार, एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन (Pan) आणि आधार कार्ड (Addhar Card) अनिवार्य असणार आहे. याबाबतची सूचना केंद्रीय प्रत्‍यक्ष कर मंडळाने (CBDT) मे महिन्‍याच्‍या सुरुवातीलाच लागू केली होती. या नव्‍या निर्णयामुळे करचोरी रोखण्‍यास मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

नव्‍या नियमाच्‍या माध्‍यमातून सरकार अधिकाधिक लोकांना कर कक्षेत आणणार आहे. जे मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करतात, परंतु त्यांच्याकडे पॅन कार्ड नाही किंवा ते प्राप्‍तिकर परतावा भरत नाहीत, अशा व्यवहारांचा शोध सहज लागणार असून, यामुळे करचोरी रोखण्यासही मदत होईल.

रोख रक्कम काढण्याबाबत कर विभागाचा नवा नियम...

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्‍तिकर (पंधरावी सुधारणा) नियम, २०२२ अंतर्गत नवीन नियम जारी केले आहेत. याबाबतची अधिसूचना १० मे २०२२ रोजी जारी करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार अशा व्यवहारांसाठी पॅन व आधार कार्ड देणे आवश्यक असणार आहे.

१. एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक लोकांच्या खात्यात २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख ठेवीसाठी पॅन, आधार कार्ड सादर करणे अनिवार्य असेल.

२. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँक खाती किंवा सहकारी बँका किंवा पोस्ट ऑफिसमधून २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख काढण्यासाठी पॅन आणि आधार आवश्यक असेल.

३. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही बँक किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडले तर त्याला पॅन आणि आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.