पुणे (Pune) : फेडरेशनची नोंदणी करताना संबंधितांना पूर्ण कल्पना न देणे, नोंदणीपूर्व संस्थेची नोटीस न देणे, गृहरचना संस्थांची सहमती घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच फेडरेशनचे सभासद फक्त गृहरचना संस्थांचे होऊ शकतात. वैयक्तिक गाळेधारक किंवा नियोजित गृहरचना संस्थांना सभासद असल्याचे दाखवून नोंदणी केली आहे. ठरावाद्वारे नियुक्ती केली नसतानाही फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक असल्याचे भासवून नोंदणी केली आहे, अशी अनेक धक्कादायक निरीक्षणे नोंदवीत इंदिरा शंकर नगरी सहकारी गृहरचना संस्था संघाची (फेडरेशन) नोंदणी विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली.
कोथरूडमधील ‘इंदिरा शंकर नगरी’ या सुमारे १४ एकरच्या परिसरात असलेल्या ३६ सोसायट्या आणि ६० हून अधिक रो-हाउस यांचा विषय आहे. या सोसायट्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता आणि त्यांची मान्यता न घेता इंदिरा शंकर नगरी सहाकारी गृहरचना संस्थांचा संघ (फेडरेशन) मर्यादित स्थापन करण्यात आला. फेडरेशनच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण परिसराच्या पुनर्विकसासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून निविदा मागविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील काही सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण झाले असून सातबारा उताऱ्यावर सोसायट्यांची नावेदेखील लागली आहेत, तर काही सोसायट्यांची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना सोसायट्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता एक फेडरेशन स्थापन करण्यात आले. त्या फेडरेशनचे सभासद म्हणून सोसायट्यांतील अध्यक्षांची नावे सभासद म्हणून दर्शवून त्यांच्या नावाने परस्पर शुल्कही भरले. तसेच फेडरेशनच्या नावाने संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडून सोसायट्यांना नोटिसा गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे २० ते २२हून अधिक सोसायट्यांनी विरोध केल्यामुळे आणि ‘सकाळ’ने वाचा फोडल्यानंतर कोथरूड परिसरात चर्चेचा विषय झाला होता. फेडरेशनने जिल्हा उपनिबंधकांकडे मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेल्या अर्जाच्या विरोधात सोसायट्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर उपनिबंधकांपुढे सुनावणी सुरू होती. दरम्यान सोसायट्यांकडून होत असलेल्या विरोधाची दखल घेत फेडरेशनने स्वत:हून मागील महिन्यात संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना दिले होते.
फेडरेशनच्या नोंदणीवरही सोसायट्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अर्ज केला होता. त्यावर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी फेडरेशनची नोंदणी रद्द करण्यात येत असल्याचा निकाल दिला. हा निकाल देताना सुर्वे यांनी अनेक धक्कादायक निरीक्षणे निकालपत्रात नोंदविली आहेत. त्यांचे पत्र ‘सकाळ’कडे उपलब्ध झाले आहे. सोसायट्यांच्या वतीने ॲड. दौलतराव हिंगे, ॲड. एकनाथ जावीर, ॲड. मंदार ठोसर, ॲड. अभिजित निरगुडे यांनी बाजू मांडली. यापुढील काळात सोसायट्यांतर्फे फेडरेशनच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात येईल, असेही सोसायट्यांच्या सभासदांनी सांगितले.
१. विरोध केल्यामुळे यश
सोसायटीधारकांना विश्वासात न घेता इंदिरा शंकर नगरी परिसराचे परस्पर फेडरेशन स्थापन करून मानीव अभिहस्तांतरण करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला होता. परंतु परिसरातील सोसायट्यांनी एकत्र येऊन विरोध केल्यामुळे लढ्याला अखेर यश आले. यासंदर्भात विभागीय सहनिबंधकांकडे सुरू असलेल्या दाव्यांचा निकाल सोसायटीधारकांच्या बाजूने लागला असून फेडरेशनची नोंदणी रद्द झाली आहे,’’ अशी माहिती तेथील रहिवासी ॲड. अरुंधती बांगर, विजयकांत गायकवाड, संजय पटवर्धन, जयश्री मुरकुटे, शांताराम बांगर, बंडोपंत सोयाम, सुप्रभा काळे, कुणाल चव्हाण, चंद्रकांत ढमाले, श्याम ढाकणे, नितीन कुलकर्णी, समीर पाटील, प्रवीण जगताप आणि नितीन ठाकूर यांनी सांगितले.
२. उपनिबंधकांचा निकाल कधी?
संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी फेडरेशनने जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज केला होता, तो फेडरेशनने मागे घेतला आहे. तसे पत्रही फेडरेशनने जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना दिले आहे. त्यास एक महिन्याहून अधिक कालावधी झाला. त्यावर उपनिबंधक कधी निर्णय देणार, असा सवालही तेथील रहिवासी महेंद्र काळे, नीलेश सौंदाणे, आशिष चौबे, रमेश घारे, दिलीप शिंदे, नीलेश येवले आणि राहुल धिडे यांनी उपस्थित केला.