Hinjewadi IT Park Tendernama
पुणे

Hinjewadi IT Park : किवळे-वाकड-बालेवाडी 8 किमी एलिव्हेटेड मार्गाला मंजुरी; पण कामाला मुहूर्त कधी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आयटी पार्क हिंजवडीसह (Hinjewadi IT Park) लगतच्या गावांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) मुक्तता करण्यासाठी मुंबई-बंगळूर महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळे ते वाकड-बालेवाडी या सहापदरी एलिव्हेटेड प्रकल्पाला गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा (कासारवाडी) ते खेड या एलिव्हेटेड आठपदरी मार्गालाही मंजुरी मिळाली आहे. त्याच धर्तीवर आयटी पार्कजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किवळे-वाकड-बालेवाडी या सुमारे आठ किलोमीटर अंतराच्या एलिव्हेटेड मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र, युद्ध पातळीवर सर्व टेंडर प्रक्रिया राबवून हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणे, आयटी पार्क हिंजवडीसह लगतच्या सर्व भागासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण हिंजवडी आयटीसह माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई, ताथवडे, पुनावळे, वाकड, रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील वाहतूक समस्या अतिशय जटिल बनली आहे.

सद्यःस्थिती

बाह्यवळण मार्गावर किवळेपासून वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. त्यातच या भागातील प्रमुख रस्त्यांसह सर्व सेवा रस्त्यांची पावसात अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने तासनतास वाहतूक कोंडीचा सामना आयटीयन्ससह सर्वांनाच करावा लागत आहे.

मोठमोठ्या खड्ड्यांतून वाट काढताना दमछाक होत असून, अनेकांना व्याधींनी ग्रासले आहे. भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे येथील भुयारी मार्गांची रुंदी व उंची कमी असल्याने या भागाला जणू कोंडीचे ग्रहण लागले आहे.

वस्तुस्थिती

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते वाकड पर्यंतच्या परिसरात महामार्गाच्या दोनही बाजूंना प्रचंड डेव्हलपमेंट झाली आहे. मोठमोठे गृहप्रकल्प, व्यापारी संकुले, शैक्षणिक संकुले, रुग्णालये, कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स झाली आहेत. शेकडो कामे सुरू आहेत. शिवाय, महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड लोकवस्ती वाढली आहे.

गेल्या दहा वर्षांत दुप्पटीपेक्षा अधिक लोकसंख्या झाली आहे. परिणामी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात रुंद केलेले रस्तेही आता कमी पडू लागले आहेत. बाह्यवळण मार्गाचेही रुंदीकरण गरजेचे आहे.

भुयारी मार्ग कोंडीचे हॉटस्पॉट

बाह्यवळण मार्गावर मामुर्डी, विकासनगर, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक व भुजबळ चौक येथे भुयारी मार्ग आहेत. त्यातील किवळे आणि भुजबळ चौकाजवळील दोन्ही भुयारी मार्ग पुरेशा उंचीची केली आहेत. मात्र, ताथवडे, पुनावळे येथील भुयारी मार्ग कमी उंचीचे आहेत.

तर भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे भुयारी मार्गात थोडा पाऊस पडताच तळे साचून वाहनांच्या रांगा लागतात. पुनावळे, ताथवडे भुयारी मार्ग तुलनेने उंची आणि रुंदीने अतिशय लहान असल्याने दररोज होणाऱ्या येथील कोंडीला सर्वजण पुरते वैतागले आहेत.

वाकडमधील भुजबळ चौक आणि भुमकर चौकामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नियोजित एलिव्हेटेड प्रकल्पामुळे कोंडी फोडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन वाहनचालकांना मोकळा श्वास घेण्याचे मुभा मिळेल अशी अपेक्षा आहे.

- प्रा. गणेश शितोळे

मी रोज कामानिमित्त डांगे चौक ते हिंजवडी असा प्रवास करत असतो. केवळ तेरा किलोमीटर अंतर ये-जा करण्यासाठी तासानतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. ऑफिसला जाणे असो की घरी, कोंडी असतेच. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी योग्य प्रयत्न प्रशासनाने केले पाहिजेत.

- मंजित शिंदे, आयटीयन्स

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या कामाचा नवीन डीपीआर तयार आहे. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

- सुभाष घंटे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण