elevated corridor Tendernama
पुणे

Hinjawadi IT Park : एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार का?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक आटीयन्स पिंपरी-चिंचवडमधील आहेत. यातही पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे, वाकड, पुनावळे, रावेत, मामुर्डी, किवळे या भागांतील आयटीयन्सची संख्या जास्त आहे.

ही सर्व उपनगरे ही हिंजवडीपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. ती पुणे-बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला विकसित होत आहेत. मात्र, सध्याची या महामार्गावरील सेवा रस्त्यांची अवस्था व उपनगरांमधील खराब रस्ते यामुळे हिंजवडी हाकेच्या अंतरावर असूनही नागरिकांना तासन् तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणांबरोबरच ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची मागणी जोर धरत आहे.

का हवा उन्नत मार्ग?

पिंपरी-चिंचवडमधून हिंजवडीमध्ये येणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांना मुंबई-बंगळूर महामार्गावर ओलांडून जावे लागते. त्यासाठी या मार्गावरील भूमकर चौक, ताथवडे व पुनावळे या भुयारी मार्गांचा वापर होतो. या भुयारी मार्गांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीतच आयटीयन्सचा वेळ जातो. येथून सुटका झालीच तर हिंजवडीतील वाहतूक कोंडीत ते अडकण्याची शक्यता असते.

त्यामुळे या भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, भुयारी मार्गांचा विस्तार हा किवळे- देहूरोड उन्नत मार्गाच्या कामावरच अवलंबून असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

फक्त घोषणा प्रत्यक्ष काम कधी?

या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी किवळे-बालेवाडी उन्नत मार्गिकेची घोषणा करण्यात आली होती. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना हा मार्ग सोयीचा पडणार आहे. यामुळे सध्या महामार्गावर येणारा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या मार्गिकेच्या प्रकल्पात पाचही भुयारी मार्गांचाही विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेचे काम झाल्यानंतर हिंजवडीकडे ये-जा करणाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळू शकतो. मात्र, या प्रकल्पाचा डीपीआर अद्याप मंजूर झाला नसल्याने हे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

खराब सेवा रस्ते डोकेदुखी

- पिंपरी-चिंचवड व पुण्यातून हिंजवडीत जाण्यासाठी सध्या भूमकर चौक व वाकड चौक या दोन रस्त्यांचा केला जातोय वापर

- हिंजवडीकडे वळण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी सेवा रस्त्यांचा करावा लागतोय वापर

- सेवा रस्त्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत

- पावसाळ्यात सेवा रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर केली जातेय तात्पुरती डागडुजी

आयटीयन्सच्या समस्या

- मोठे व कोंडीमुक्त रस्ते, उपनगरांचा उत्तम विकास असा शहराचा नावलौकीक असल्याने आयटी अभियंत्यांनी हिंजवडी आयटी पार्कजवळील उपनगरांमध्ये घरे घेतली

- शहरातील आयटीयन्सही देखील सेकंड होम घेण्यासाठी पुनावळे, वाकड, रावेत, ताथवडे या परिसराचा पर्याय निवडला

- उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

- रस्त्यांची दुर्दशा, सेवा रस्त्यांवर पडलेले खड्डे, सांडपाणी वाहिनी व स्टॉर्म वॉटर लाइनचे रखडलेले काम

- अनेक पायाभूत सुविधांची कमतरता

- मेट्रोच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीस अडथळा

हे व्हायला हवे

- सेवा रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण

- उन्नत मार्गाचे काम सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक

- मुंबई - बंगळूर महामार्गाला -उपनगराने जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण

- रस्त्यांवर पावसाचे पाणी साठू नये यासाठी स्टॉर्म वॉटर लाइनचे काम

- सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे

- पिंपरी-निगडी मेट्रो मार्गासोबतच निगडी-रावेत-पुनावळे-ताथवडे-वाकड-हिंजवडी अशी मेट्रो मार्गिका