पुणे (Pune) : गेल्यावर्षी केलेल्या दुरुस्तीच्या कामाची तपासणी करण्यासाठी येथील उड्डाणपुलावरून (Flyover) सोलापूर (Solapur) व सासवड (Saswad) मार्गावर होणारी वाहतूक बंद केल्याने पुलाखालील मार्गावर प्रवाशांना मोठ्याप्रमाणात कोंडीला (Traffic Jam) सामोरे जावे लागत आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही त्यामुळे कोंडी होत आहे.
हा पूल वाहतुकीला धोकादायक झाल्याने गेल्यावर्षी त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. वर्षभरानंतर त्याची तपासणी करण्यासाठी शनिवार व रविवारी असे दोन दिवस त्यावरील सोलापूर व सासवडकडे होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील मगरपट्टा चौक ते रवीदर्शन चौक या सुमारे दोन किलोमीटर अंतरात वाहनांच्या रांगा लागून दिवसभर कोंडी होत आहे.
या कोंडीत अडकल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामगार, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आदींना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत इच्छित स्थळी पोहचताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
एका अधिकाऱ्यासह वीस पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन करण्यासाठी गुंतले आहेत. त्यामुळे संथगतीने का होईना वाहतूक पाठवा पुढे सरकत आहे. पर्यायी रस्ते नसल्याने पुलाखालील मार्गावर वाहनांचा मोठा ताण आलेला आहे. सकाळी व सायंकाळी एकाचवेळी मोठ्याप्रमाणात वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा दूरवर खोळंबा होत आहे. ही वाहनांची रांग पुलाच्या मागेपुढे दोन्हीही बाजूने वाढत असल्याने रुग्णवाहिकांना काही काळ अडकून पडावे लागले.
या परिसरात दररोजच मोठ्याप्रमाणात वाहतूक होत आहे. सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेत वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक संथ गतीने होते. पुलावरील वाहतूक बंद केल्याने खालील मार्गावर ताण वाढला आहे. ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी नियमन करीत आहेत.
- सुनील जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा हडपसर
आयआरसीच्या नियमानुसार उड्डाणपुलावरील लोड टेस्टिंग करण्याचे काम सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने लोडची वाहने पुलावर थांबवून ही तपासणी करण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल.
- श्रीनिवास बोनाला, विशेष प्रकल्प प्रमुख, महापालिका