Khadakwasla To Phursungi Tunnel Tendernama
पुणे

पुणे जिल्ह्यातील 'या' प्रकल्पाबाबत गुड न्यूज; आता डिसेंबरमध्ये...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकवासला धरण ते फुरसुंगी (Khadakwasla Dam To Phursungi) असा २५ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यासाठी माती (मृद) परिक्षणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. बोगदा ज्या भागातून जाणार आहे, त्या मार्गावरील पन्नास टक्के माती परिक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करून बोगद्याचे डिझाईन आणि अंदाजपत्रक निश्‍चित केले जाईल. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणातून कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती व चोरीमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यामुळे खडकवासला धरण ते फुरसुंगी असा २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखली होती. मात्र, निधी कसा उभारावा, या प्रश्नामुळे ही योजना अनेक वर्षे रखडली होती. मध्यंतरी या योजनेला चालना देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार टेंडर मागवून एका खासगी कंपनीला हे काम दिले. संबंधित कंपनीने दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

ज्या मार्गाने बोगदा जाणार आहे, त्या मार्गावरील जमिनींची मृदा तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बोअर खोदण्यात येत आहेत. आतापर्यंत जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर प्रकल्पाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत प्रकल्पाचा डीपीआर तयार होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.

नेमका प्रकल्प काय?
७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान पाणी नेण्याचा प्राथमिक आराखडा निश्‍चित केला आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता एक हजार ५१० क्यूसेस होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. भूमिगत कालवा तयार करताना कालव्याचा मार्गात काही ठिकाणी बदल होणार आहे. त्यासाठी ५८ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्पासाठी खर्च किती?
बोगद्याचे काम टीबीएम मशिनच्या साहाय्याने करायचे झाल्यास सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो, तर डीबीएम (ड्रील अँड ब्लास्ट) पद्धतीने हे काम केले, तर त्यासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे हे काम कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करायचे, याचा निर्णय शासन स्तरावर अद्याप झालेला नाही. दरम्यानच्या कालावधीत बोगद्यासाठी जमीन योग्य आहे की नाही, यासाठी बोअर खोदण्याचे काम सुरू केले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.