पुणे (Pune) : चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणचा प्रस्तावित बाह्यवळण मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने प्रस्तावित केलेला रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा मार्ग अजूनही लाल फितीत अडकलेला आहे. अनेक वर्ष हा मार्ग होणार असे सांगितले जाते. परंतु वाहतूक कोंडीला पर्याय असणारा हा बाह्यवळण मार्ग काही होत नाही. तो लवकर व्हावा अशी नागरिक, उद्योजक, कामगारांची मागणी आहे.
या मार्गाच्या हद्दी निश्चित झाल्या नाहीत. त्यामुळे मार्ग नेमका कोठून, कसा होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव येथे बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा असला तरी तो का होत नाही असा प्रश्न नागरिक, कामगार, उद्योजक करत आहेत. दरम्यान चाकणला बाह्यवळण मार्ग व्हावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ॲड. संकेत मेदनकर यांनी दिले आहे.
या संदर्भात वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांशी पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गाचे काम मार्गी लावावे, अवजड वाहतूक शहराबाहेरून जाण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकर व्हावा असे नमूद करण्यात आले आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनीही हे काम लवकर होईल असे आश्वासन दिले होते. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक या मार्गाने येऊन चाकण-शिक्रापूर मार्गाकडे जाणार आहे. शिक्रापूर मार्गाने आलेली नगर, मराठवाड्यातील वाहतूक पुणे-नाशिक महामार्गावर येऊन पुणे, नाशिक, तळेगाव, मुंबई या भागाकडे जाणार आहे.
दृष्टीक्षेप
१) तीस वर्षांपासून प्रस्तावित मार्ग
२) आठ महिन्यांपूर्वी ३६ मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्त्याची अधिकाऱ्यांकडून प्राथमिक पाहणी
३) हद्द निश्चितीचे काम झाले नाही
असा असेल मार्ग
चाकण बाह्यवळण मार्ग हा रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, बंगला वस्ती हा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा आहे. हा मार्ग ३६ मीटर रुंदीचा चार पदरी आहे. दोन्ही बाजूला दोन लेन राहणार असून मध्यभागी दुभाजक होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चौक करण्यात येणार आहे. बाह्यवळण मार्गाच्या जमिनी बहुतांशपणे शेतकऱ्यांच्या आहेत. या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना तसेच इतरांना एफएसआय तसेच रोख रक्कमेचा मोबदला देण्यात येणार आहे. या जमिनींचे संपादन झाल्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी एजन्सीची नेमणूक केल्यानंतर ही एजन्सी मार्गाच्या हद्द निश्चिती व इतर कामे करणार आहे. परंतु पीएमआरडीएने या मार्गाबाबत अजून काही हालचाली सुरू केल्या नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या मार्गासाठी राखीव निधी
हा बाह्यवळण मार्ग होण्यासाठी पीएमआरडीने पंचवीस कोटी रुपयांचा राखीव निधी ठेवला असल्याचे समजते. पण या मार्गाचे काम पीएमआरडीए कधी सुरु करणार हा प्रश्न आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत गावे जाऊन विकास होत नसेल तर पीएमआरडीएच्या हद्दीतून गावे वगळा असाही नागरिकांचा प्रश्न आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते, पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे या मार्गाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हा मार्ग झाल्यास अपघात कमी होतील. वाहतूक कोंडीही कमी होईल.