Maharashtra Police Tendernama
पुणे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी अखेर मिळाली हक्काची जागा

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय २०१८ मध्ये अस्तित्वात आले. त्याच्या इमारतीसाठी जाधववाडी, चिखलीतील हक्काची जागा मिळाली आहे. या जागेवर पोलिस आयुक्तालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड असेल.

शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी अस्तित्वात आले. आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन सहा वर्षे झालीत. परंतु, आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळालेली नव्हती. गेल्या सहा वर्षांपासून पोलिस आयुक्तालयास स्वतंत्र इमारत नाही. सध्या चिंचवड येथील महापालिका शाळेच्या इमारतीत भाडेतत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू आहे. ती जागा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालय, इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थानांसाठी जागा आवश्यक आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार जाधववाडीतील जागा मिळाली आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर पोलिस आयुक्त कार्यालय, निवासस्थान आणि कवायत मैदानासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.

चिखली ठाण्यालाही जागा

भोसरी विधानसभा मतदार संघातील जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ पै. मधील ३ हे. ३९ आर. जागेत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी पोलिस अधिकारी निवासस्थान व परेड ग्राउंड होणार आहे. तसेच, चिखली पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी नऊ गुंठे जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आयुक्तालयासह चिखली पोलिस ठाण्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

हद्दीतील पोलिस ठाणे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चिखली, निगडी, सांगवी, वाकड, रावेत; खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, म्हाळुंगे; मावळ तालुक्यातील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव; मुळशी तालुक्यातील हिंजवडी या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. हिंजवडी ठाण्यांतर्गत पुण्यातील बालेवाडी, म्हाळुंगे, बावधन, सूस आदी गावांचा समावेश आहे.

‘‘आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य शासन आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. जाधववाडीत जागा मिळाली आहे. आता मनुष्यबळ वाढेल. सायबर ब्रॅंच आली आहे. नवीन पोलिस ठाणे निर्माण झाली आहेत. विशेषतः समाविष्ट गावांना स्वतंत्र पोलिस ठाणे मिळाले.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी