Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
पुणे

Pune : पानशेत पूरग्रस्तांच्या मालकी हक्काच्या प्रक्रियेस दिवसेंदिवस विलंब; नागरिकांकडून इशारा

Ashok Jawale

पुणे (Pune) : पानशेत पूरग्रस्तांच्या गृहनिर्माण संस्थांच्या जागा रहिवाशांच्या मालकी हक्काच्या करून देण्याच्या प्रक्रियेस दिवसेंदिवस विलंब होऊ लागला आहे. गृहनिर्माण संस्थांकडून कागदपत्रे, पंचनामे असे सर्व सोपस्कार पूर्ण करूनही या कामाला गती मिळत नाही. सरकार, राजकीय पक्षांकडूनही केवळ आश्‍वासनेच दिली जात असल्याने आता रहिवाशांचा संयम सुटू लागला आहे. त्यातूनच आता शासनाने संबंधित काम त्वरित पूर्ण न केल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

सहकारनगर येथील क्रमांक एक व दोनमध्ये मोठ्या प्रमाणात पानशेत पूरग्रस्तांच्या गृहरचना सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या जागा मालकी हक्काने करून देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारने त्याबाबत अध्यादेश काढला. त्यानंतर जागा मालकी हक्काची करून देण्यासाठीची प्रक्रिया सहा महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करून देण्यास सांगितले. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे तसेच आंबिल ओढ्याला पूर आल्यामुळे त्यावेळी संबंधित काम झाले नाही. त्यानंतर कोरोनामुळे काम रखडले.

दरम्यान, या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सहा जून २०२३ ला शासनाने निर्णय घेतला. त्यानंतरही जागा मालकी हक्काने करून देण्याच्या प्रक्रियेला गती येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत १०३ पैकी केवळ पाच ते सहा सोसायट्यांची कामे झाली आहेत. अखेर, या सर्व प्रकाराला कंटाळून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उर्वरित संस्थांच्या मालकी हक्काचे काम पूर्ण न झाल्यास रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे.

पूरग्रस्त सोसायटीतील रहिवासी शशिकांत प्रसादे म्हणाले, ‘‘वेगवेगळी कारणे सांगून गृहनिर्माण संस्थांच्या जागा मालकी हक्काने करून देण्यास विलंब केला जात आहे. १०३ पैकी केवळ पाच ते सहा सोसायट्यांचीच कामे झाली आहेत. त्यातही त्यांच्याकडून केवळ पैसे भरून घेतले आहेत. प्रत्येक सरकारकडून आम्हाला केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. सभासद असणाऱ्या अनेक नागरिकांचा वृद्धत्वामुळे मृत्यू होत असल्याने अडचणीत आणखीनच वाढ होत आहे. आम्ही निवडून दिलेल्या व्यक्तींकडून आमची कामे होत नसतील, तर आम्ही मतदान कशाला करायचे? त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.’’

पानशेत पूरग्रस्त रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्थांच्या जागा मालकी हक्काने करून देण्याच्या कामाला गती येण्याची गरज आहे. राजकीय पक्ष केवळ आश्‍वासने देत आहेत, ही कामे लवकर होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या मतदानावर नागरिक बहिष्कार टाकू शकतात.

- शशिकांत बडदरे, सचिव, पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण संस्था विकास मंडळ