PM Awas Tendernama
पुणे

Good News : अवघ्या 14 लाखांत मिळणार हक्काचे घर! अडीच लाख अनुदानही मिळणार

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : चऱ्होली, बोऱ्हाडेवाडीपाठोपाठ महापालिकेने (PCMC) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) डुडुळगाव येथील प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत बांधकाम पूर्ण करून लाभार्थींना सदनिकांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. एक हजार १९० सदनिकांचा हा प्रकल्प असून, केवळ १४ लाख १४ हजार रुपयांत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वप्नातील घर मिळणार आहे. राज्य व केंद्र सरकारचे अनुदान सदनिकांसाठी मिळणार आहे.

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत, डुडुळगाव, वडमुखवाडी, चिखली, दिघी, पिंपरी व आकुर्डी आदी ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअंतर्गत एकूण नऊ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील दोन हजार ७३० सदनिकांचे सोडत काढून वाटप झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पात अनुक्रमे ३७० व ५६८ सदनिका आहेत. रावेत येथील प्रकल्प ९३४ सदनिकांचा असेल. मात्र, तो न्यायप्रविष्ट आहे. डुडुळगाव गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याचा सविस्तर कृती आराखडा (डीपीआर) केंद्र सरकारने मंजूर केला होता.

महापालिकेकडून कार्यवाही

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगावामध्ये उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याने प्रतिलाभार्थींचा स्वहिस्सा १४ लाख १४ हजार १७३ रुपये निश्चित करण्यात आला होता. याबाबतच्या विषयास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर दिली. त्यामुळे लाभार्थींकडून अर्ज मागविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे मिळेल अनुदान

डुडुळगाव आवास योजनेतील लाभार्थींना केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून एक लाख असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. लाभार्थींच्या स्वहिस्स्यासह एका सदनिकेची किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये होते. प्रकल्पासाठी १६७ कोटी ८२ लाख ७५ हजार ८३६ रुपये दराची टेंडर स्वीकृत केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करून लाभार्थींना सदनिका वितरित करण्याचे नियोजन आहे. पार्किंगसह १५ मजल्यांची एक इमारत आहे.

- चंद्रकांत इंदलकर, नगरसचिव, महापालिका

सद्यस्थिती

- प्रस्तावित एकूण पाच इमारती

- आता चार इमारतींचे काम सुरू

- एका इमारतीचे काम लवकरच सुरू होणार

असा असेल प्रकल्प

- वाहनतळ आणि १५ मजले

- एका इमारतीत २३८ सदनिका

- एकूण सदनिका ११९०