Maharashtra Police Tendernama
पुणे

खूशखबर! पोलिस दलात तब्बल 15 हजार जागा भरणार; वाचा सविस्तर...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पोलिस दलात नोकरी करण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पोलिस दलातील संभाव्य भरतीबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले आहे. अहमदनगरमधील पोलिस दलाच्या एका कार्यक्रमावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी ही माहिती दिली. पोलिस दलात विविध पदांच्या जागा रिक्त असून, त्यासाठी मोठी भरती होणार आहे, असे सुतोवाच वळसे यांनी यावेळी केले. (Maharashtra Police Bharti News)

महाराष्ट्र पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात 15 हजार पदे भरण्यात येणार आहे. त्याबाबतची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर 15 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती वळसे यांनी दिली.

पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्‍यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. पोलिस उपअधिक्षक पदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यानुसार, बदल्यांसंदर्भात योग्य ती पारदर्शकता पाळण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

15 जूनपासून राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामध्ये विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहितीही वळसे यांनी दिली.