Jobs Tendernama
पुणे

Good News! पुणे महापालिकेत नोकर भरती; 'या' संस्थेकडे जबाबदारी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगरपालिकेत सुमारे ५०० रिक्त पदांची भरती होणार आहे. या प्रकियेत कोणतेही गैरप्रकार घडू नयेत व गुणवत्तेवर कर्मचारी निवडले जाण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) या संस्थेकडून ही भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक यासह पदांची भरती होणार आहे.

महापालिकेत गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पदभरती झाली नाही. वर्ग एक ते वर्ग चारपर्यंत सुमारे ११ हजार पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर महापालिकेचा कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. तसेच कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असले, तरी त्यावर मोठा खर्च होत आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविली आहे. यामुळे अत्यावश्यक असलेली पदभरती पहिल्या टप्प्यात महापालिका करणार आहे.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांची संख्या कमी असल्याने त्यांची प्रामुख्याने भरती केली जाणार आहे. तसेच सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी, अग्निशामक दल यातील पद भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेतंर्गत परीक्षा घेण्यासाठी महापालिकेने ‘आयबीपीएस’ संस्थेशी करार केला आहे. पदभरतीसाठी मोठ्याप्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह इतर शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.

महापालिकेच्या पदभरतीसाठी ‘रोस्टर’चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल. आयबीपीएस या संस्थेकडून ही प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यासाठी करार करण्यात आला आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

एका उमेदारासाठी साडेसातशे रुपये खर्च

वर्ग तीनची पदभरती करताना सरळसेवा भरती केली जाते. त्यामध्ये केवळ परीक्षा होते. ‘आयबीपीएस’कडून ऑनलाइन परीक्षा घेताना सर्वप्रकारचे शुल्क व कर मिळून एका उमेदवारासाठी किमान ७५० रुपये खर्च महापालिकेला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.