PMP Tendernama
पुणे

Good News! पुणेकरांना एका क्लिकवर समजणार PMP बसचे लाइव्ह लोकेशन

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांना मोबाइलवरच ‘पीएमपी’च्या बसचे लाइव्ह लोकेशन (Track PMP Bus Live Location On Mobile) समजावे म्हणून बसथांब्यांचे व मार्गांचे मॅपिंग करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातील सुमारे १५०० बसथांबे व ५८० मार्गांचे मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे अवघ्या एक ते दीड महिन्यांत गुगलकडून (Google) ‘पीएमपी’च्या बसची लाइव्ह लोकेशन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पीएमपी वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने मागील सहा महिन्यांपासून यासाठी डेटा (Data) गोळा केला आहे. आता यावर एका खासगी संस्थेकडून लॅटिट्यूड (अक्षांश व रेखांश) निश्चित करण्याचे काम केले जात आहे.

पीएमपी प्रशासन व गुगलचे अधिकारी यांच्यात नुकतीच एक बैठक झाली. यात आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. बसथांब्यांची व मार्गांच्या मॅपिंगबद्दल चर्चा झाली. सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम झाल्यानंतर सर्व डेटा गुगलकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

असा होणार प्रवाशांना फायदा
- प्रवाशांना मोबाइल ॲपवरच बसचे लाइव्ह लोकेशन समजेल.
- बस कोणत्या मार्गावरून येत आहे? बस वाहतूक कोंडीत अडकली आहे का? आपल्या थांब्यापासून ती किती दूर आहे? आपल्या इच्छित स्थळाचे तिकीट दर किती, किती वेळ लागेल, आदींची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार
- गुगल ही सेवा मोफत देणार आहे.
- गुगल मॅप ॲपमध्ये आपण प्रवास सुरू करण्याच्या व पोचण्याच्या ठिकाणाची माहिती देतो, तशीच माहिती येथे द्यावी लागणार आहे.
- उदा. गुगल मॅपमध्ये स्वारगेट ते कात्रज असे टाइप केल्यावर त्या मार्गावर धावणाऱ्या बस, लाइव्ह लोकेशन, त्यांच्या वेळा याबाबतची सर्व माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळणार आहे.

पहिल्यांदा २० मार्गांची निवड
‘लाइव्ह ट्रॅकिंग फॉर कम्युटर्स’ असे या सुविधेचे नाव आहे. याची चाचपणी करण्यासाठी ‘पीएमपी’ने २० लांब पल्ल्यांच्या मार्गांची निवड केली आहे. चार महिने याचा अभ्यास करून काय अडचणी येतात का, हे पाहण्यात येणार आहेत. चार महिन्यांनंतर उर्वरित सर्व मार्ग व सर्व बससाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळेल. यासाठी वीस बसची मदत घेतली जाणार आहे.

‘गुगल’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. त्यांच्या मागणीनुसार आवश्यक तो डेटा संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत सेवा सुरू होईल.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी, पुणे