Railway Station Tendernama
पुणे

रेल्वेची गुड न्यूज; रिझर्व्हेशनची कटकट कमी होणार, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीत (PRS) महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. आरक्षण प्रणालीसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर पूर्णपणे बदलून त्या जागी वेबबेस्ड सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत जुनेच सॉफ्टवेअर वापरले जाते. पहिल्यांदाच मुळातून हा बदल केला जात आहे. त्यामुळे रेल्वेची आरक्षण प्रक्रिया ही आणखी सुरक्षित व गतिमान होणार आहे. तिकीट काढताना काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला तर तो तत्काळ दूर करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विना व्यत्यय तिकीट मिळेल. (Nwe

‘क्रिस’ या संस्थेकडून रेल्वेच्या आरक्षण प्रणालीचे काम केले जाते. ९०च्या दशकात रेल्वेत आरक्षण तिकिटाची सुरवात झाली. तेव्हा आरक्षित तिकीट काढण्यासाठी जी प्रणाली वापरली जात होती, त्याच कालबाह्य झालेल्या प्रणालीच्या साहाय्याने प्रवाशांना तिकीट दिले जात होते. त्यामुळे प्रणालीत काही बदल करावयाचे झाल्यास त्यासाठी बराच वेळ लागत होता. यात नवीन रेल्वेची नोंद करणे, बदलेल्या गाड्यांचे मार्ग, रद्द झालेल्या गाड्या यासाठी देखील मेहनत घ्यावी लागत होती. तसेच हे सॉफ्टवेअर कालबाह्य झाल्याने ते कधीही बंद पडण्याची भीती कायमच होती. रेल्वेची सुमारे ७० टक्क्यांहून अधिक तिकीटे ऑनलाइन पद्धतीने काढली जातात. ऑनलाइन तिकिटांसाठी ‘आयआरसीटीसी’ ही स्वतंत्र संस्था काम करते. ‘क्रिस’च्या तुलनेत आयआरसीटीसी अधिक वेगवान आहे. देशात टप्प्याटप्प्याने क्रिस बदल करीत आहे. सध्या मुंबई येथे हा बदल केला जात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी पुण्यासह अन्य विभागात केली जाणार आहे.

याचा फायदा काय?
१. नवे तंत्रज्ञान वेबबेस्ड असल्याने ते अधिक गतिमान व सुरक्षित मानले जाते.
२. संगणकाच्या आरक्षण प्रणालीत बिघाड झाला तर तो तत्काळ दुरुस्त करता येईल.
३. नवीन बदल करणे अथवा नवीन गाड्या विषयी माहिती समाविष्ट करणे हे लागलीच शक्य.
४. काही बिघाड झाला तर प्रवाशांना विनाव्यत्यय तिकीट मिळेल.