PMRDA Tendernama
पुणे

PMRDA कडून गुड न्यूज! 'त्या' 19 हजार लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas) स्वत:च्या मालकी जागेवर वैयक्तिक घरकुल (Gharkul) बांधण्यासाठी १९ हजार लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. या लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) संकेतस्थळ व मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता घरबसल्या योजनेची माहिती मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतंर्गत ‘पीएमआरडीए’ने पहिल्या टप्प्यात १३ हजार ८४१, तर दुसऱ्या टप्प्यात पाच हजार २७१ लाभार्थ्यांच्या अहवालास मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या अर्जाबाबत माहिती घरबसल्या मिळण्यासाठी www.pmaypmrda.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व तालुक्यातील मंजुरी मिळालेल्या एकूण १९ हजार ११२ लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी प्रसिद्ध केली आहे. लाभार्थ्यांची ही यादी www.pmrda.gov.in आणि www.pmaypmrda.in या दोन्ही संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे. तसेच लाभार्थ्यांना ‘पीएमएवाय’ योजनेत त्याच्या सद्य:स्थितीची माहिती घेण्यासाठी pmaypmrda हे मोबाईल उपयोजन (ॲप) उपलब्ध करून दिले आहे.

याचा वापर करून लाभार्थ्यांनी अनुदान मागणी, बचतखाते पुस्तिका संकेतस्थळावर अपलोड करावी. तसेच लाभार्थ्यांना स्वत:च्या घराचे जीओटॅग छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.

या संकेतस्थळांवर विस्तृत प्रकल्प अहवालातील मंजूर लाभार्थ्यांची यादी, मंजूर लाभार्थ्यांना दिलेल्या बांधकाम कार्यादेश यादी, प्रकल्प अहवालातील अपरिहार्य कारणाने रद्द करायच्या लाभार्थ्यांची यादी कारणांसह दिली आहे. आतापर्यंत एकूण १९ हजार ११२ लाभार्थ्यांपैकी दहा हजार ८६० लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यापैकी एक हजार ८३६ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले असून, एक हजार ५५२ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे एक लाख रुपये अनुदान वितरित केले आहे. तसेच दुसऱ्या हप्त्याचे ९९४ लाभार्थ्यांना एक लाख अनुदान वितरित केले आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या हप्त्याचे ८२ लाभार्थ्यांचे अनुदान ५० हजाराप्रमाणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘पीएमआरडीए’कडून लाभार्थी अनुदानापोटी २५.४६ कोटी आतापर्यंत वितरित केले आहेत, असेही ते म्हणाले.