Pune Traffic Tendernama
पुणे

लाखो पुणेकरांसाठी गुड न्यूज; कोथरूड, सिंहगड रोडकडे जाणे होणार सोपे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पेठा, शिवाजीनगर हा भाग कोथरूड, सिंहगड रस्ता, वारजे परिसराला जोडणारा आणि या भागातील लाखो नागरिकांसाठी सोईचा असणारा बाबा भिडे पूल ते रजपूत वस्ती हा नदी काठचा रस्ता अखेर चार महिन्यानंतर सुरू होत आहे. महापालिकेने येथील आवश्‍यक काम पूर्ण केले असून, गुरुवार (ता. १२) सकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

रजपूत वस्ती येथील रस्ता चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, धायरी, कर्वेनगर यासह इतर भागातील नागरिकांना नदी काठच्या रस्त्याचा वापर करता येत नाही. त्यांना कर्वे रस्ता किंवा सिंहगड रस्त्यावरून मोठा वळसा घालून वाहतूक कोंडींतून जावे लागत असल्याने नागरिकांच्या गैरसोईबद्दल वृत्त प्रकाशित केले होते.

त्यानंतर प्रशासनाने चार दिवसांत रस्ता खुला करू असे आश्‍वासन दिले होते. ती मुदत उलटून गेली तरीही काम सुरू होतेच. रजपूत वस्तीमध्ये पथ विभागाशिवाय मलःनिसारण आणि पाणी पुरवठा विभागाच्या कामांना जास्त वेळ लागला, त्यामुळे पथ विभागाला रस्त्याचे डांबरीकरण करता येत नव्हते.

हे काम संपल्याने अखेर बुधवारी (ता. ११) दुपारी रजपूत वस्तीत खोदलेला रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले असून, हा रस्ता गुरूवार सकाळपासून सुरू होणार आहे. पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे यांनी याला दुजोरा दिला.