Khadki Tendernama
पुणे

Good News! जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी 74 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे (Old Mumbai - Pune Road) रुंदीकरण करून बीआरटी मार्ग विकसित करण्याबरोबरच बोपोडी येथील उर्वरित कामे पूर्ण करणे या कामांसाठी ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनाअभावी सहा वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम आणि बीआरटी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडणार आणि सर्वाधिक वाहतूक असलेला जुना मुंबई-पुणे महामार्ग हा एक रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु, पुणे महापालिका हद्दीत लष्कराने खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागा दिली नव्हती. यासाठी महापालिकेकडून गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) ४२ मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. सध्या हा रस्ता केवळ २१ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेकडून २०१५ पासून पाठपुरावा सुरू होता. २०१६ मध्ये याचे टेंडर काढले होते, पण रस्त्यासाठी जागाच ताब्यात नसल्याने काम झाले नव्हते. आता सहा वर्षानंतर लष्कराने ही जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. तर काहींनी टीडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई घेण्याची तयारी दाखवली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमून टेंडर प्रक्रिया राबविली. त्यात कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर यांचे सर्वात कमी दराचे म्हणजे ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांचे टेंडर आले. पूर्वगणनपत्रकापेक्षा हे टेंडर १६ टक्के कमी आहे. या टेंडरला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने सहा वर्षांपूर्वी टेंडर काढले होते. त्यावेळी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु जागाच ताब्यात न आल्याने हे टेंडर रद्द करण्यात आले होते. परिणामी, सहा वर्षांत या कामाचा खर्च २५ कोटींनी वाढला आहे.