Go Green Tendernama
पुणे

'महावितरण'ची Good News! 'गो-ग्रीन' निवडणाऱ्यांना मिळणार...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांमध्ये पश्चिम महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील एक लाख १६ हजार २४३ वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला. त्यामुळे त्यांना प्रतिबिल १० रुपये सवलत महावितरणने दिली आहे. (MahaDiscom - Go Green)

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात ८० हजार ९१६, सातारा ८ हजार ५११, सोलापूर ८ हजार ६१५, कोल्हापूर १० हजार ९५ आणि सांगली जिल्ह्यात ७ हजार २८६ वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षभरात ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत ३१ हजार २०० वीजग्राहकांचा सहभाग वाढला आहे. महावितरणची पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणने ‘गो-ग्रीन’ योजना सुरू केली आहे. यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तत्काळ ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय त्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे.

असा निवडा गो-ग्रीनचा पर्याय
महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.