Bridge Tendernama
पुणे

Pune : 'या' पुलामुळे मुंढवा, घोरपडी आणि कल्याणीनगरमधील रहिवाशांची गैरसोय होणार दूर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावर मुंढवा येथील उड्डाणपुलाचे काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्णय महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील बैठकीत घेण्यात आला. हा उड्डाणपूल झाल्यानंतर मुंढवा, घोरपडी आणि कल्याणीनगर येथील रहिवाशांची गैरसोय दूर होईल. हे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले, मात्र कोरोनामुळे ते संथ गतीने सुरू होते. आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना संयुक्त बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.

आमदार कांबळे म्हणाले,‘‘ लष्कर भागातील नागरिकांना मुंढवा, केशवनगर, खराडी या भागांत जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. तेथील रहिवाशांनाही पुणे शहरात येण्यासाठी हे करावे लागते. त्यात वेळ वाया जातो, तसेच वाहतूक कोंडीही होते. या मार्गावरून दिवसभरात सुमारे १०४ रेल्वेगाड्या जातात. तेवढ्या वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. ’’

पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या टेंडरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवाळीपर्यंत टेंडर मागवण्यात येतील. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाल्यानंतर मुंढवा, केशवनगर, खराडी या पूर्व पुण्याच्या भागात जाण्यास लागणारा वेळ कमी होणार आहे. त्याचबरोबरच वाहतूक कोंडी दूर होणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.