पुणे (Pune) : पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने ७७५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या निधीतून गड-किल्ले, पर्यटन आणि तीर्थस्थळांचा विकास करण्यात येणार आहे, तर भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक विकसनासाठीही पन्नास कोटींचा निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
हवेली तालुक्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी दिला आहे. किल्ले शिवनेरीवर शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ४५ कोटींचा आराखडा तयार केला आहे, तर सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतून तीन कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे.
हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या वढू (बु.) येथील स्मारकाच्या विकासासाठी २६९ कोटी २४ लाखांच्या विकास आराखड्यातील टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. अष्टविनायक विकासासाठी ४३ कोटी २३ लाखांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून, प्राचीन मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. भिडेवाडा येथील सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
श्री क्षेत्र जेजुरी विकासासाठी १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील मुख्य मंदिराच्या जतन संवर्धनाच्या कामाची आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. त्यामुळे वनपर्यटनाला चालना देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे बिबट सफारी सुरू करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.