Pune City Tendernama
पुणे

पुण्यातील उड्डाणपुलांचा लवकरच मेकओव्हर; तीन कोटीतून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) ‘जी २०’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर कामांना गती आलेली आहे. खासगी विकसकांकडून चौक सुशोभित केले जात असताना प्रकल्प विभागाकडून शहरातील १७ पुलांना रंग देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये तीन कोटी रुपये खर्च करून तब्बल एक लाख चौरस फुटाचे रंगकाम केले जाणार आहे.

यंदाच्या ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आलेले आहे. महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी बैठका होणार आहेत. पुण्यात जानेवारी महिन्यात एक व जून महिन्यात दोन बैठका होणार आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीसाठी अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. १४ जानेवारीपासून जी २०चे सदस्य असलेल्या देशांचे व भारताने निमंत्रित केलेले १७ देशाचे असे एकूण ३७ देशाचे प्रतिनिधी पुण्यात तीन ते चार दिवस वास्तव्यासाठी असणार आहेत. हे प्रतिनिधी ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या व्हीआयपी मार्गाची दुरुस्ती, सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तसेच प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याने तेथेही सुशोभीकरण केले जात आहे. शहरातील ६० चौकात खासगी विकसकांकडून सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. तर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने १७ उड्डाणपूल, नदीवरील पूल, समतल विगलक यांचे रंगकाम सुरू केले आहे. यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे.

प्रकल्प विभागाने सुरवातीला १७ पुलांसाठी एकच टेंडर काढले होते, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आता हे टेंडर रद्द करून विभागानुसार टेंडर काढल्या आहेत. पण यास उशीर होत असल्याने जुन्या ठेकेदारांकडून तातडीने कामे करून घेण्यावर भर दिला जात आहे.

या पुलांची कामे सुरू...

संगमवाडी पूल (पाटील इस्टेट नदीवरील पूल), सीओईपी उड्डाणपूल , कृषी महाविद्यालय उड्डाणपूल, संभाजी पूल ( लकडी पूल), स्वारगेट उड्डाणपूल, सेव्हन लव्हज चौक उड्डाणपूल, रामटेकडी उड्डाणपूल, मगरपट्टा चौक उड्डाणपूल, हडपसर गाडीतळ उड्डाणपूल, मुंढवा रेल्वे उड्डाणपूल, मुंढवा नदीवरील पूल, रामवाडी भुयारी मार्ग, संचेती समतल विगलक, मॉडर्न हॉटेल समतल विगलक, बंडगार्डन पूल, बंडगार्डन बंधारा याठिकाणी रंगकाम केले जाणार आहे.