पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) अरुंद पूल पाडण्याचे नियोजन २ ऑक्टोबरपासून करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबरला पूल प्रत्यक्षात पाडण्यात येणार असून याकाळात पुणे-बंगळुरू (Pune-Bengluru) महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घ्यावा लागणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व विभागांकडून सूक्ष्म नियोजन करून दक्षता घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘पुमटा’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्यात येणार आहे. हा पूल पाडण्यासाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागणार आहे. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच ५ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी नविन अतिरिक्त सेवारस्ते तयार करून त्यावरून वाहतुकीचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
चार दिवसांत यंत्रणांची बैठक
पूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील निवासी भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार आहे. तसेच पर्यायी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय पूल पाडल्यानंतर पडणारा राडारोडा उचलण्यासाठी आवश्यक व्यवस्था, ऐनवेळी येणाऱ्या समस्या यांचे निवारण करण्यासाठी एनएचएआय, पूल पाडणारी कंपनी, वाहतूक पोलिस यांची एकत्रित बैठक पुढील चार दिवसांत घेण्यात येणार आहे. सर्वंकष नियोजन झाल्यानंतरच पूल पाडण्याची कार्यवाही केली जाईल. पूल पाडण्यापूर्वी माध्यमांसह, समाजमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल, जेणेकरून या ठिकाणाहून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होणार नाहीस, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.